Karla : कंटेनरच्या अपघातात दुचाकीवरील सीआरपीएफ जवानासह पत्नी ठार

एकविरा देवी दर्शन घेऊन गावाकडे जाताना काळाचा घाला

एमपीसी न्यूज- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकी गाडीला मागून जोरात धडक दिल्याने कंटेनरच्या चाकाखाली चिरडून दुचाकीवरील पती पत्नी दोघांचा दुदैवी मृत्यु झाला.

सुशांत हिंदूराव निकम (वय 27), आरती सुशांत निकम ( वय 23, दोघेही रा. वांजोळी, ता. खटाव, जि. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या सीआरपीएफ जवान व त्यांच्या पत्नीचे नाव आहे.

सुशांत हे सीआरपीएफ मधील जवान असून आसाम येथे कार्यरत असतात. तीन महिन्यापुर्वी त्यांचा विवाह झाला असून ते पनवेल येथे सासुरवाडीच्या लोकांना पत्नीसह भेटायला गेले होते. आज सकाळी पुन्हा साता-याला जात असताना आई एकविरा देवीचे दर्शन घेऊन दुपारी दोनच्या सुमारास कार्ला फाट्यावरुन पुण्याकडे जात असताना मुंबईकडुन भरधाव वेगात आलेला कंटेनर क्र. (एम एच 43 एडी 4577) सुशांत यांची दुचाकी क्र (एम एच 11 सी पी 8511) बसल्याने गाडीवरील त्यांचे नियंत्रण सुटले व पती आणि पत्नी दोघेही कंटेनरच्या चाका खाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनर चालकाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

कार्ला फाट्यावर उड्डाणपुलाची मागणी

कार्ला फाट्यावर आजपर्यंत अनेक अपघात झाले असून कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या चौकात एकविरा देवी मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच मळवली स्थानकाकडे जाणारा रस्ता असल्याने वाहनांची गर्दी माणसांची वर्दळ असते. तसेच शाळा, काॅलेज, सरकारी कार्यालये, बॅका असल्याने हा वर्दळीचा चौक आहे. याठिकाणी सातत्याने अपघाताच्या घटना घडत असल्याने कार्ला फाटा येथे उड्डाणपूल बांधण्यात यावा अशी मागणी याभागातील नागरिकांनी अनेक वेळा केली आहे. मात्र शासनाकडून याकडे दुलर्क्ष होत असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता तरी शासनाने या अपघातांची दखल घेत उड्डाणपूल बांधावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.