Karla : एकविरा देवी मंदिरात सुरु असलेला भ्रष्टाचार व अफरातफरीची सखोल चौकशी करा – धर्मादाय आयुक्तांचा आदेश

दोषींवर कारवाई न झाल्यास भाविकांचा उग्र आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज- कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरात सध्या सुरु असलेला भ्रष्टाचार, दमदाटी व दहशतीने देणगीच्या पैशाची सुरु असलेली अफरातफर व गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून विश्वस्त संजय गोविलकर व संबंधित व्यक्ती यांच्यावर तातडीने कारवाई करुन त्याबाबतचा अहवाल मुख्यालयास सादर करावा असा आदेश धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी धर्मादाय सहआयुक्त पुणे विभाग यांना दिला आहे.

एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी याबाबत मुख्य धर्मदाय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सदर आदेश 1 आॅगस्ट 2018 रोजी देण्यात आला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करत भाविकांच्या देणगी पैशांवर डल्ला मारणार्‍यां लाभार्थी विश्वस्तांवर कडक कारवाई करावी अन्यथा भाविकांच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा अनंत तरे यांनी दिला आहे. धर्मदाय आयुक्तांनी दिलेला चौकशी आदेश व लाभांर्थी विश्वस्तांकडून मंदिरात सुरु असलेला भ्रष्टाचार व पैशांची अफरातफर याविषयी माहिती देण्याकरिता तरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना तरे म्हणाले.

अनंत तरे म्हणाले की, देवस्थानचे लाभार्थी विश्वस्त व पुजारी असलेले संजय गोविलकर यांनी मंदिरात भाविकांची लूट सुरु केली असून मनमानीपणे भाविकांचे देणगी पैसे व मनिआॅर्डरचे पैसे बँकेत जमा न करता परस्पर स्वतःकडे ठेवत आहेत. अभिषेकाला येणार्‍या भाविकांचे पैसे घेतले जातात मात्र त्यांना प‍ावती न देता पैसे लाटले जात आहेत. देवीला भक्तीभावाने वाहिलेला दागिना हडप केला जातो आहे. गोविलकर यांनी याकरिता देवस्थानच्या व्यवस्थापकांना विश्वस्तांची कसलिही मिटिंग न घेता धाक दडपशाहिने कामावरुन कमी करत देवस्थानमधून पूर्वी कमी केलेल्या लोकांना कामावर घेत भ्रष्टाचार माजविला आहे.

गावातील काही तथाकथित पुढारी यांनी देखील पायथा मंदिराप्रमाणे देवीचे मुख्य मंदिरावर ताबा मिळविण्याकरिता देवस्थानमध्ये राजकारण घुसविले आहे. एकविरा देवीच्या मंदिरात काही लाभांर्थी विस्वस्तांनी बाजार मांडला असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व पैशांची अफरातफर सुरु केली आहे. देवीची दानपेटी परस्पर फोडत पैसे स्वतःकडे ठेवले आहे. भाविकांच्या पैशांची सुरु असलेली ही लूट तातडीने न थांबल्यास भाविकांच्या वतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा अनंत तरे, आग्री समाजाचे नेते राजाराम पाटील, जयेंद्र खुणे, विद्या म्हात्रे आदींनी दिला आहे. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष मदन भोई, नवनाथ देशमुख, विलास कुटे, मधू भोईर, अरविंद भोईर, दिलीप पाटील उपस्थित होते.

घटनेत दुरुस्तीकरिता य‍ाचिका दाखल करणार

देवस्थानची घटना ही लाभांर्थी विश्वस्तांनी त्यांना पूरक बनवली आहे. त्या घटनेनुसार विश्वस्त संस्थेत नऊ पैकी चार लाभार्थी आहेत. तसेच देवस्थानला मिळणार्‍या उत्पन्नापैकी 75 टक्के वाटा गुरवांना व केवळ 25 टक्के वाटा देवस्थान संस्थेला मिळतो. तसेच देवीला वाहिलेले नारळ, हार, दागिने, साड्या हे सर्व गुरवांना जाते. देवस्थानला मिळणारे 25 टक्के उत्पन्न हे कामगारांचा पगार, वीज व पाणी बिल, किरकोळ दुरुस्त्या यावर खर्च होत असल्याने देवस्थानाचा विकास करण्याकरिता विश्वस्त संस्थेकडे निधी शिल्लक रहात नाही. याकरिता 2005 साली मारुती देशमुख यांनी घटनेत बदल करत उत्पन्नाच्या 75 टक्के वाटा, हार, नारळ, साड्या व दागिना देवस्थानला मिळावा व गुरवांना 25 टक्के वाटा मिळावा अशी याचिका दाखल केली होती. या याचिकेचा तातडीने निकाल लागावा तसेच घटनेत दुरुस्ती करून लाभांर्थी विश्वस्तांच्या जागी देवीच्या भाविक भक्तांचा म्हणजे कोळी, आग्री, सिकेपी, सोनार, कुणबी, मराठा या प्रत्येकाचा एक प्रतिनिधी, वेहेरगावचे सरपंच व एक गुरव प्रतिनिधी असावा अशी मागणी भाविकांच्या वतीने करण्यात येणार आहे.

चार विश्वस्तांचे निलंबन

एकविरा देवीच्या मंदिरात मनमानी कारभार करत पैशाची अफरातफर व भ्रष्टाचार करणार्‍या चार विश्वस्तांवर जुलै महिन्यात निलंबनाची कारवाई करून तसा बदल अहवाल पुणे सहा.धर्मदाय आयुक्तांना सादर करण्यात आला असल्याचे अनंत तरे यांनी सांगितले. लाभार्थी विश्वस्त संजय गोविलकर, विजय देशमुख, काळूराम देशमुख, पार्वतीबाई पडवळ यांचा यामध्ये समावेश आहे. असे असताना देखील ही मंडळे मंदिरावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. लाभार्थी विश्वस्तांना पदावरुन कमी करा असा आदेश धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी नुकताच पारित केला आहे, त्यानुसार घटना दुरुस्ती करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.