Karla : कार्ला गडावर एकविरा देवीच्या यात्रेची जय्यत तयारी

गुरुवारी माहेरघरात व शुक्रवारी एकविरा गडावर रंगणार पालखी मिरवणूक सोहळा

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील प्रसिध्द देवस्थान असलेल्या कार्ला वेहेरगाव गडावरील श्री एकविरा देवीच्या चैत्री यात्रेची जय्यत तयारी एकविरा देवस्थान प्रशासकिय मंडळ समिती वेहरगाव कार्ला यांच्या वतीने करण्यात आली आहे.

देवीचा उत्सव गुरुवार दिनांक ११ एप्रिल ते शनिवार १३ एप्रिल दरम्यान चालणार असुन गुरुवारी चैत्र शुध्द षष्टीला माहेरघरी ( देवघर) याठिकाणी देवीचा भाऊ असलेल्या बहीरी देव पालखी सोहळा तर शुक्रवार दि. १२ एप्रिल चैत्र शुध्द सप्तमीला सायंकाळी सात वाजता मुख्य यात्रा म्हणजे श्री आई एकविरा देवीचा पालखी सोहळा वाजत गाजत मांगल्यपूर्ण वातावरणात सुरु होणार आहे.

या काळात वेहेरगाव एकविरा मंदिरात येणाऱ्या भाविकांना योग्य प्रकारे दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार रणजित देसाई, मंडल अधिकारी माणिक साबळे, कार्ला तलाठी घनश्याम सोमवंशी, वेहेरगाव ग्रामस्त, एकविरा देवस्थानचे आजी माजी विश्वस्त व विविध शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.

एकविरा देवस्थानच्या अंतर्गत वादामुळे या वर्षी प्रथमच प्रशासनाच्या अधिकाराखाली चैत्री यात्रेचे नियोजन करण्यात आले असून यात्रे दरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मावळ प्रशासन सज्ज झाले आहे. यात्रेदरम्यान गड व परिसरात तसेच वेहरगाव, कार्ला, मळवली याठिकाणी चार दिवस दारुबंदी तर यात्रेच्या मुख्य दिवशी लोणावळा शहरात दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्ला फाटा या ठिकाणी प्रत्येक वाहनाची तपासणी करुन गडावर दारु जाणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे तेसेच चोवीस तास अखंडित वीजपुरवठा ठेवण्यात येणार असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी व यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाचे लोणावळा उपविभागीय अधिकरी ज्ञानेश्वर शिवथरे व लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांच्यासह अधिकारी वर्ग व २०० पोलीस कर्मचारी यामध्ये शीघ्र पोलीस दलाच्या तुकड्या, स्ट्रायकिंग पथक, साध्या वेशातील पोलीस, दंगल नियंत्रण पथके तैनात असणार आहेत. गडावर फटाके वाजवण्यासोबत पशुहत्येला बंदी करण्यात आली आहे.

सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय रहावा याकरिता नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असुन याठिकाणी प्रत्येक शासकीय विभागाचे अधिकारी आपत्कालीन व्यवस्थापनासाठी उपलब्ध राहणार आहेत. तसेच कर्मचारी तत्काळ संपर्कासाठी इंटरकाँम सेवा, सीसी टिव्ही कँमेरे, क्लोज सर्कीट टिव्ही, डाँक्टरांचे सेवा पथक, पायऱ्या दुरूस्ती, सुलभ शौचालयात पाण्याची व्यवस्था, पार्कींगच्या राखीव जागा, भाविक भक्तांसाठी रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी व स्वच्छतेसाठी वेहरगाव दहिवली सरंपच सचिन येवले व उपसरपंच द्रोपदा गायकवाड यांच्यासह सदस्य मंडळाकडून ठोस सोय करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.