Karvenagar : धीर सोशल फाउंडेशनतर्फे अंधांना काठ्यांचे वाटप

एमपीसी न्यूज – धीर सोशल फाउंडेशनतर्फे गरजवंत अंधांना काठ्यांचे वाटप करून नववर्ष साजरे करताना अंधांनाही त्यात सामावून घेण्याचा अनोखा प्रयोग करण्यात आला व अंध व्यक्तींनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला.

याबाबतची अधिक माहिती देताना धीर सोशल फाउंडेशनच्या प्रमुख नीना ओसवाल म्हणाल्या की आपण सारेच नववर्ष साजरे करताना विविध कार्यक्रमांचे आयोजन करतो. मात्र अंधांच्या विश्वात रंगांचा आणि विविधरूपी आनंदांचा समावेश करण्याचा एक वेगळा विचार आम्ही यावेळी राबविला व अंधांसह आम्ही सारीच उपस्थित मंडळी आनंदी झालो. याप्रसंगी अंध व्यक्तीची दैनंदिन गरज असलेली अंधांसाठीची काठी आम्ही अंध व्यक्तींसाठी दिली. राजाराम पुलाशेजारील मातोश्री आश्रमात हा कार्यक्रम पार पडला.

या उपक्रमांतर्गत सूरसागर या अंध कलाकारांच्या वाद्यवृंदाने अनेक श्रवणीय गाण्यांचे गायन, वादन केले आणि उपस्थितांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व अंध कलाकार व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने आयोजीत करण्याचा मनोदय धीर सोशल फाउंडेशनच्या ललीत ओसवाल आणि कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमास जीतो महासंघाच्या संस्थापक अंचल जैन, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिश शहा, युवक जीतो महासंघाचे पुणे अध्यक्ष, सतीश शहा, समाजसेवक नितिन जैन, जीतो महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हिराचंद राठोड, सामाजिक कार्यकर्त्या निहालिका चव्हाण, बाळासाहेब बांगर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.