Kasarwadi: कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हॉटेल कलासागरचाही सहभाग

हॉटेलमध्ये डॉक्टरांना राहण्याची सोय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना राहण्यासाठी पिंपरीतील कलासागर हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टरांसाठी हॉटेलचे मालक अशोक भोसले यांनी 40 खोल्या उपल्बध करून दिल्या आहेत. माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या विनंतीला मान देत त्यांनी खोल्या उपलब्ध करुन दिल्या आहेत.

जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाने भारतात देखील चांगलाच शिरकाव केला आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.   पुणे जिल्ह्यातही कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून, पिंपरी-चिंचवड शहरात 35 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. यातील 12 रूग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. 22 सक्रिय रुग्णावर उपचार सुरु आहे. वायसीएममध्ये 19 आणि पुण्यातील रुग्णालयात 3 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील सात भाग महापालिका प्रशासनाने सील केले आहेत.

कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना आपल्या घरातही विलगीकरणात राहणे गरजेचे आहे. कुटुंबातील इतरांना आपल्यापासून कोरोनाची बाधा होऊ नये, अशी भिती या डॉक्टरांना सतावत आहे. काही डॉक्टर आपल्या घरी जाण्यासही धजावत नाहीत. त्यामुळे महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि विद्यमान नगरसेवक एकनाथ पवार यांनी पिंपरीतील कलासागर हॉटेलचे मालक अशोक भोसले यांच्याशी संपर्क साधत डॉक्टरांना राहण्यासाठी हॉटेलमधील खोल्या देण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन भोसले यांनी हॉटेलमधील 40 खोल्या डॉक्टरांना राहण्यासाठी  11 एप्रिलपासून उपल्बध करून दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.