Kasarwadi : ‘कासारवाडीत आणखी इमारती धोकादायक अवस्थेत, बिल्डरांनी निकृष्ट दर्जाचे केले बांधकाम’

माजी नगरसेवक किरण मोटे यांचा आरोप

एमपीसी न्यूज – कासारवाडी परिसरात इमारतीची सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत बालकाचा हकनाक मृत्यू झाला आहे. तसेच दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या परिसरात आणखी इमारती या धोकादायक अवस्थेत असून भविष्यातही अशाच घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. याबाबत माजी नगरसेवक किरण मोटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनांत म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 30 कासारवाडीमधील गुलिस्थाननगर येथील यशवंत प्राईड या इमारतीची सीमाभिंत घरावर अचानकपणे कोसळली. सदर दुर्घटनेत एका 6 वर्षाच्या लहान बालकाचा बळी गेला. तसेच ड्रेनेज विगातील ठेकेदारीवर काम करणारे दोन मजूर जखमी झाले. भविष्यात देखील अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते से मोठे यांनी म्हटले आहे.

सदर ठिकाणी साईकुंज, साई विनायक रेसिडन्सी, यशवंत प्राईड व विकासशिल या 4 इमारती आहेत. या इमारतीची मागील बाजूची सीमाभिंत साईनगर, गुलिस्ताननगर या दाट लोकवस्तीत असणा-या भागावर कोसळू शकते. सदर इमारतीचे बांधकाम, बांधकाम व्यावसायिक व विकसकांनी केले आहे. त्यांना आपल्या बांधकाम परवानगी विभागाने विविध परवाने व दाखले दिलेले आहेत. तरी या इमारतीची मजबूती व सीमाभिंतीचे काम योग्य नसल्याचे झालेल्या दुर्घटनेतून समोर आलेले आहे.

तरी सदर इमारती बांधणारे बांधकाम व्यावसायिक यांना आपल्या बांधकाम विभागातर्फे सूचना देऊन, त्वरित नव्याने सर्व इमारतींच्या सीमाभिंती योग्यप्रकारे बांधून देण्याचे आदेश द्यावेत व परिसरातील नागरिकांच्या मनात असलेली दहशत व भीती दूर करावी अशी मागणी किरण मोटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.