Kasarwadi News : मुलामुलींसाठी नव्याने बांधण्यात येणा-या शाळेचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज – नवीन बांधण्यात येणा-या शाळेमुळे कासारवाडी फुगेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांकरीता शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होणार असून त्यातून या शाळेतील विद्यार्थी त्यांचे उज्वल भविष्य निर्माण करतील असा सार्थ विश्वास महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केला.

कासारवाडी प्रभाग क्र. २० येथील स. न. ४२० मध्ये मुलामुलींसाठी नव्याने बांधण्यात येणा-या छत्रपती शाहू महाराज शाळेचे भूमिपूजन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास उपमहापौर हिराबाई घुले, माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्य शाम लांडे, नगरसदस्या सुजाता पालांडे, स्विकृत नगरसदस्य माऊली थोरात, ह प्रभाग अधिकारी विजयकुमार थोरात, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

नगरसदस्य शाम लांडे म्हणाले, भविष्यातील पिढी चांगली होण्याच्या दृष्टीकोनातून शाळा बांधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे असे सांगून छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने तयार होणा-या या शिक्षण संस्थेतून वरिष्ठ दर्जाचे अधिकारी निर्माण व्हावेत असा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवला असल्याचेही त्यांनी सांगितले.

या नियोजित शाळेच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ ८६५५ स्वेअर मीटर असून शाळेची इमारत ५ मजले अधिक पार्किंग अशी असून त्यामध्ये तळमजल्यावर शाळेचे कार्यालय, प्राचार्य कक्ष, आऊटडोअर प्ले एरिया आहे. पहिल्या मजल्यावर स्टाफ रुम, मिटींग हॉल आहे तसेच दुस-या मजल्यावर ग्रंथालय असून तिस-या मजल्यावर ड्रॉईंग, क्राफ्ट असून, चौथ्या मजल्यावर मोठा बहुउद्देशीय हॉल, लेक्चर्स हॉल, सांस्कृतिक हॉल, प्रदर्शन हॉल तयार करण्यात येणार आहे.

पाचव्या मजल्यावर सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून मुलामुलींसाठी प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र स्वच्छतागृह असणार आहे. शाळेत बालवर्ग ते १० वी पर्यंत शिक्षणाची सोय असणार आहे. शाळेच्या बांधकामासाठी सुमारे १३ कोटी इतका खर्च येणार आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता अनिल राऊत यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.