Kasarwadi News : पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही – प्रवीण दरेकर

एमपीसी न्यूज – पोलिसांवर होणारे हल्ले ही लज्जास्पद बाब आहे. आपल्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलिसांची सुरक्षा आज धोक्यात आली आहे. ही आपल्याला शोभा देणारी गोष्ट नाही. यापुढे पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

शहरात कंटेनर मागे घेण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून वाहतूक विभागातील पोलीस शिपाई रवींद्र करवंदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले.

त्यात करवंदे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पोलीस करवंदे यांची आज (सोमवारी, दि. 1) विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कासारवाडी येथील रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

प्रवीण दरेकर म्हणाले, “जखमी पोलीस करवंदे यांना भेटलो आणि चौकशी केली. तसेच डॉक्टरांशी चर्चा केली असून त्यांना गंभीर इजा झाली आहे. मात्र, त्यांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांवर वारंवार हल्ले होत आहेत.

पोलिसांवर हल्ले होणा-या ठिकाणी मी पोहोचतो. मुंबई येथे पोलिसांवर झालेल्या सामूहिक हल्ल्याच्या वेळी देखील मी तिथे पोहोचून त्याबाबत उपोषण केले होते. यामागे भावना हीच आहे की, यापुढे पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही.

कारण जो पोलीस आमची सुरक्षा करतो. ज्या पोलिसांमुळे आज आपण सुरक्षित आहोत, त्याच्याच सुरक्षेची चिंता असेल तर त्याबाबत कोणाकडे मागणी करायची, ? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.

दरेकर पुढे म्हणाले, “आता या हल्ला प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घेत व्यवस्थेवर नीट लक्ष देऊन समाजातील अशा प्रवृत्तीच्या लोकांची पुन्हा हिम्मत होणार नाही, अशा कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे. यात मी लक्ष घालून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे.

आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी करणार आहे. आरोपींना पकडणे, तुरुंगात टाकणे आणि पुन्हा जामिनावर परत येणे, यामुळे प्रश्न सुटणार नाही. ही प्रवृत्ती मुळासकट नष्ट केली पाहिजे, असेही दरेकर यांनी सांगितले.

पूर्वी गावात हाफ पॅन्टवर पोलीस यायचे. एक दंडुका घेऊन जरी पोलीस आले तरी आख्ख गाव शांत व्हायचं. आज हे कमी होताना दिसत आहे. याचा अर्थ सरकारचे, प्रशासनाचे, व्यवस्थेकडे लक्ष नाही. करवंदे यांना मदतीची काही कमी पडणार नाही.

पण सरकारने असे प्रकार होऊ नयेत यासाठी गंभीर दखल घेणं गरजेचं असल्याचेही दरेकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.