Kasarwadi : पोलिसांच्या हद्दीच्या वादात वाहत आलेला मृतदेह घाटावर पडून

एमपीसी न्यूज – पवना नदीत वाहत आलेला मृतदेह अग्निशमन विभागाच्या जवानांनी बाहेर काढला. मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिसांच्या हद्दीच्या वादात तो मृतदेह कासारवाडी येथील घाटावर तसाच पडून राहिला. अग्निशमन विभागाने संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता त्यांना प्रथम उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर बराच वेळानी सांगवी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पुढील कार्यवाहीस सुरुवात केली.

राहुल रवींद्र नाणेकर (वय 36, रा. शिंदे आळी, पिंपरीगाव) असे वाहून गेलेल्या इसमाचे नाव आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मृत राहुल नाणेकर मद्यप्राशन करून पिंपरी गावातून काळेवाडीकडे जाणाऱ्या पुलावरून पवना नदीमध्ये उतरला. तिथून त्याने नदीमध्ये उडी मारली. पाण्याच्या प्रवाहाने राहुल नदीत वाहून गेला. गुरुवारी सकाळी कासारवाडी घाटावर कार्यरत असलेल्या अग्निशमन विभागाच्या जवानांना राहुलचा मृतदेह आढळला. जवानांनी मृतदेह तात्काळ बाहेर काढला.

अग्निशमन विभागाच्या जवानांनी वाकड पोलीस ठाणे आणि संत तुकाराम नगर पोलीस चौकीला याबाबत कळवले. मात्र, दोन्ही ठिकाणी अग्निशमन विभागाच्या जवानांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच ही आपली हद्द नसल्याचे हे सांगण्यात आले. पोलिसांनी संबंधितांचे संपर्क क्रमांक देण्यास देखील टाळाटाळ केली. यामुळे अग्निशमन विभागाचे जवान संभ्रमावस्थेत मृतदेहाजवळ ताटकळत थांबले. त्यानंतर बराच वेळानी सांगवी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाहीस सुरुवात केली. दरम्यान, वाकड पोलिसांनी राहुल नाणेकर याची हरवल्याची तक्रार आपल्याकडे दाखल असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like