Kasarwadi: पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करणाऱ्या नवरा-नवरीची पोलीस ठाण्यात वरात!

विमेन हेल्पलाईनचा पाठपुरावा व पोलीस आयुक्तांचे पाठबळ

एमपीसी न्यूज – पहिली पत्नी हयात असताना घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला विमेन हेल्पलाईन या संस्थेने चांगलाच धडा शिकवला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा करून हे बेकायदेशीर लग्न रोखून नियोजित वधू-वराची वरात थेट पोलीस ठाण्यात नेली.

पहिली पत्नी हयात असताना किंवा तिला घटस्फोट न देता पती दुसरे लग्न थाटामाटात करायला निघाला असल्याची तक्रार संबंधित महिलेने चिंचवड येथील विमेन हेल्पसाईन या सामाजिक संस्थेकडे केली. पहिली पत्नी आणि दोन मुलांना वाऱ्यावर सोडून पती बेकायदेशीरपणे दुसरा विवाह करत असल्याने हतबल झालेली ती महिला आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत होती.

  • विमेन हेल्पलाईनच्या संस्थापक अध्यक्षा नीता परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित महिलेची भेट घेऊन तिला धीर दिला आणि आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले. त्यानंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्याबाबत पोलीस उपायुक्तांनाही लेखी फोन करून माहिती देण्यात आली. मात्र विवाह सोहळा हद्दीबाहेर असल्याचे कारण देत याबाबत आपण पिंपरी-चिंचवड पोलिसांची मदत घ्यावी, असे सांगून तेथून त्यांची बोळवण करण्यात आली. संध्याकाळी साडेसात ते रात्री साडेअकरापर्यंत वारंवार विनंती करूनही पोलिसांनी हस्तक्षेप करून विवाह सोहळा रोखण्याबाबत असमर्थता व्यक्त केली, फिर्यादीने स्वतः जाऊन लग्न रोखावे किंवा न्यायालयात दाद मागावी, असा सल्ला देखील त्यांना देण्यात आला.

या प्रकरणी विमेन हेल्पलाईनच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन व उपायुक्त स्मार्तना पाटील यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी हसतक्षेपासाठी साकडे घातले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पद्मनाभन यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांना फोन करून विमेन हेल्पलाईनच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानंतर विमेन हेल्पलाईनच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात जाऊन डॉ. व्यंकटेशन यांची भेट घेतली. त्यांनी विमेन हेल्पलाईनच्या कार्यकर्त्यांबरोबर काही पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवले आणि लग्न समारंभ असलेल्या हॉटेलमधून नियोजित वधू-वरांना ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी त्यांना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

  • हे बेकायदेशीर लग्न रोखून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील व पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांनी तातडीने मदत केली. पोलिसांच्या या सहकार्यामुळेच हा बेकायदेशीर विवाह रोखणे शक्य झाले, असे विमेन हेल्पलाईनच्या संस्थापक अध्यक नीता परदेशी यांनी सांगितले. यासाठी नीता परदेशी, शैलजा गुरव, शोभा नाफडे, हरजिंदर कौर ,सुरींदर कौर आणि विमेन हेल्पलाईन च्या इतर सदस्यांनी पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.