Pune Bye-Election : कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध करा; भाजपकडून सर्वपक्षीयांना पत्र

एमपीसी न्यूज : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून तयारी सुरु आहे. कसबा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन (Pune Bye-Election) भाजपने सर्वपक्षीयांना केलं आहे. कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर पोटनिवडणूक पार पडणार आहे. हीच पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंंती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पत्राद्वारे केली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपच्या विरोधात पोटनिवडणूक लढविली जाईल, असे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी अद्यापही भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत.

पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. एका बाजूने पोटनिवडणुकीसाठीची तयारी सुरू करणा-या भाजपचे दुसरीकडे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता अधिकृत प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राजकीय पक्षांना पत्र दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच पुणे शहरातील सर्व पक्षांच्या अध्याक्षांना पत्र देण्यात आलं आहे. देशाच्या राजकारणात महाराष्ट्रात  राजकीय संस्कृतीचं अनन्यसाधारण स्थान आहे.

Mhalunge Crime : म्हाळुंगे येथे लॉजवर छापा सहा महिलांची सुटका

राज्यात विकासकामात राजकारण केलं जात नाही. सर्व पक्षांचे संबंध चांगले आहेत. यापूर्वीची पटनिवडणुकीची पार्श्वभूमी पाहता लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर त्या जागेवर निवडणूक बिनविरोध होते. हीच परंपरा कायम राखून कसबा मतदारसंघाची निवडणूक देखील बिनविरोध करावी, (Pune Bye-Election) असं त्या पत्रात नमूद केलं आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करणे हिच मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली आहे, असंही त्या पत्रात लिहिलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.