Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यांची निविदा स्थायीकडे मंजुरीला 

एमपीसी न्यूज – वादग्रस्त निविदा प्रक्रियेमुळे गेली अनेक वर्षे चर्चेत असलेल्या कात्रज – कोंढवा  रस्त्यांच्या कामाचा १४९ कोटींचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. मुदत वाढ देऊन देखील या कामासाठी केवळ एकच निविदा आली असून ती तब्बल २२ टक्के इतक्या कमी दराने आली आहे.
महापालिकेने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा खडी मशीन चौकापर्यंतच्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या आणि ८४ मीटर रुंद रस्त्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी प्रशासनाने २०११ मध्ये डिफर्ट पेमेंट पद्धतीने हा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर हा निर्णय रद्द करून या रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

त्या तब्बल ३६ टक्के जादा दराने आल्याने त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली. त्यात दोनवेळा मुदतवाढ देऊन केवळ एकच निविदा आली आहे. प्रशासनाने या कामासाठी १९२ कोटी ४२ लाखांचे अंदाजित खर्च धरून त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, ही निविदा २२.३० टक्के इतक्या कमी दराने आली आहे. त्यानुसार आता हे काम १४९ कोटी ५२ लाखांत होणार आहे. त्यामुळे पालिकेचे तब्बल ४२ कोटींची बचत होणार आहे. या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादनाबाबत महापालिकेने मागील दीड-दोन वर्षात कुठलीही हालचाल केली नाही.
दरम्यान, विरोधी पक्षांनी मात्र या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेवर विविध स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यावर चौकशीची मागणी केली आहे. मात्र, सत्ताधारी भाजपचे हडपसरचे आमदार योगेश टिळेकर या रस्त्त्याच्या कामासाठी आग्रही आहे. त्याचबरोबर  स्थायी समितीत भाजपचे बहुमत असल्याने या निविदा मंजूर होणार असल्याचे स्पष्ट आहे. मंगळवारी होणार्‍या समितीच्या बैठकित त्यावर निर्णय होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.