Pimpri : मनावर ताबा ठेवा; अॅड. अंजली भाडळे यांचा सल्ला

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने शिक्षण दिन साजरा

एमपीसी न्यूज – ‘मन हे साधन आहे आणि ते माझे आहे. म्हणूनच मनावर येणार्‍या काजळीला, बसणार्‍या धुळीला भावनांच्या होणार्‍या कल्लोळाला माझे मनच जबाबदार आहे, असे मत अॅड. अंजली दत्ता भाडळे यांनी व्यक्त केले. मनाला ताब्यात कसे ठेवायचे, याचा गुरुमंत्र त्यांनी उपस्थितांना दिला. तसेच मनावर ताबा ठेवण्याचा सल्ला देखील त्यांनी उपस्थितांना दिला.

चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने थोर शिक्षणतज्ज्ञ डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्ण जन्मदिन शिक्षकदिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून अॅड. भाडळे बोलत होत्या. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष व पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे संस्थापक गिरीश प्रभुणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी दत्ता भाडळे, शाला समिती अध्यक्ष गतिराम भोईर, नितीन बारणे, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, समितीच्या सर्व शाळांचे, सर्व विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व अध्यापकांचा समितीतर्फे पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.

अॅड.अंजली भाडळे यांनी जीवनात येणार्‍या ताणतणावांना कसे सामोरे जावे, याचा गुरुमंत्र दिला. आपले मन ही गाडी आहे, ती कशी चालवायची हे आपण शिकलेच पाहिजे. आपला खरा चेहरा, धारण केलेले मुखवटे, आपल्या अनेक भूमिका यावर मनन, चिंतन केले पाहिजे. मनावर सातत्याने अभ्यास केला पाहिजे. असा बहुमोल सल्ला देत त्यांनी मंत्रमुग्ध करणारा सुसंवाद शिक्षकांशी साधला.

गिरीश प्रभुणे यांनी भारतीय शिक्षणाचे महत्त्व विविध उदाहरणांद्वारे सांगितले. मातृभाषेतून शिक्षण आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले. तसेच सर्व अध्यापकवर्गाला शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे कार्यवाह अॅड. सतिश गोरडे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन देत त्यांचे स्वागत केले. गुरुकुलममधील विद्यार्थीनींनी उपनिषदांमधील श्लोकांचे पठण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे आभार शाला समिती अध्यक्ष गतिराम भोईर यांनी मानले. सूत्रसंचालन आचार्या दिपाली बिरारी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like