Pimpri : आपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती

 एमपीसी न्यूज –  भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाराची सोमवारी (दि. १७) झाडाझडती घेतली. नागरिकांचे मूलभूत प्रश्न आणि विविध ११ विषयांवर त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील नागरिकांनी भाजपला मोठ्या विश्वासाने महापालिकेची सत्ता दिली आहे. त्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहेत. त्यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांनीही काम करणे अपेक्षित आहे. शहरात आजही अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. राडारोडा टाकून नद्यांचे पात्र अरूंद केले जात आहेत. अधिकाऱ्यांनी डोळे झाकून कामे करणे बंद करावे. लोकांच्या गरजा विचारात घेऊन त्या गरजांचे निवारण केले, तर लोकांचा पर्यायाने शहराचा विकास होईल. आपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा. कामात हायगय आणि टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार जगताप यांनी बैठकीत दिला.
यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, संतोष पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

 

शहरातील वाहतूककोंडींचा प्रश्न सोडविणे हे केवळ वाहतूक विभागाचे काम नाही. महापालिकेच्या संबंधित विभागांनीही शहरातील कोणत्याच रस्त्यावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. विशेषतः शहरातील मंगल कार्यालायांसाठी पार्किंग धोरण ठरवणे गरजेचे आहे. धोरण नसल्यामुळे मंगल कार्यालयांत समारंभ असताना रस्त्यांवर वाहने लावली जातात. पर्यायाने मंगल कार्यालयांच्या परिसरातील सर्वच रस्त्यांवर सामान्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब महापालिकेने गांभीर्याने घेत मंगल कार्यालयांसाठी पार्किंग धोरण निश्चित करणे अपेक्षित आहे. शहरात आजही अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. महापालिकेचे अधिकारी त्याकडे कानाडोळा करतात. नंतर हा प्रश्न गंभीर बनतो. परवानगी न घेता बांधकाम सुरू असेल, तर अधिकाऱ्यांनी तातडीने कारावी, असे त्यांनी सांगितले.

 

शहरांतील तीनही नद्यांचे अस्तित्व टिकणे गरजेचे आहे. परंतु, अनेक ठिकाणी राडारोडा टाकून नद्यांचे पात्र बुजविले जात आहे. अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्यास एक दिवस नद्यांचे पात्र शोधावे लागेल, अशी स्थिती निर्माण होईल. राडारोडा टाकण्याचा सर्व प्रकारच गंभीर आहे. परंतु, ही बाब अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत. राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करून नदीपात्र मोकळे करावेत, असे आदेश त्यांनी दिले. विकास आराखड्यातील आरक्षित जागा ताब्यात घेऊन अशा जागांना सीमाभींत किंवा कंपाऊंड करण्यासही त्यांनी सांगितले. दैनंदिन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामाचाही अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. शहरात कचऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाला संपूर्ण मदत पुरवण्याची सूचना त्यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना केली.

 

पवना धरणात पाण्याची पातळी कमी झाली आहे. उन्हाळा तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील, याची त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शहरवासीयांना कोणत्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी कमी पडता कामा नये यासाठी आतापासूनच अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली. शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीवरही लक्ष केंद्रित करण्याची सूचना त्यांनी आयुक्त हर्डीकर यांना केली. तसेच नव्या विकास आराखड्याचे काम लवकर मार्गी लावण्याची सूचनाही त्यांनी केली. शहरातील नागरिकांनी ज्या विश्वासाने भाजपला सत्ती दिली, तो सार्थ ठरवायचा आहे. त्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही काम करणे अपेक्षित आहे. कामात हायगय आणि टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. आपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा, अशा शब्दांत आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना समज दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.