Kerala Plane Crash : बचाव कार्यातील 22 जण कोरोना पॅाझिटिव्ह, जिल्हा आयुक्त व पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश

The rescue operation included 22 Corona positive, district commissioner and police officers

एमपीसी न्यूज – केरळच्या कोझिकोड येथे झालेल्या विमान दुर्घटनेवेळी बचाव कार्य करणाऱ्या 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या 22 जणांमध्ये स्थानिक पोलीस अधिकारी आणि जिल्ह्याच्या आयुक्तांचाही समावेश आहे. हे अधिकारी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी व केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना देखील भेटले असल्याचं सांगितलं जात आहे.

‘द हिंदू’ या वृत्तपत्राने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे काही दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशन मध्ये राहणार आहेत.

त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यदिनी होणारे ध्वजारोहण हे मुख्यमंत्री पिनाराई यांच्या अनुपस्थितीत होणार असून को-ऑपरेशन मंत्री कडकंपल्ली सुरेंद्रन हे उद्या तिरुअनंतपुरम येथील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावणार आहेत.

दरम्यान, दुर्घटनेत वाचवण्यात आलेल्या दोन प्रवाशांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती आली होती. त्यामुळे या प्रवाशांना बाहेर काढणाऱ्या सीआयएसएफच्या 30 जवानांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह होता. खबरदारी म्हणून दुर्घटनास्थळी प्रवाशांच्या मदतीसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व जवानांना वेगळं ठेवण्यात आलं आहे.

केरळच्या कोझिकोड येथे झालेल्या या दुर्घटनेवेळी विमानात 190 प्रवासी होते. लँडिंग करताना हे विमान रनवेवरुन घसरले व त्यामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये पायलटसह 19 जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.