Pimpri News: उपमहापौरपदी केशव घोळवे बिनविरोध, राष्ट्रवादीच्या निकिता कदम यांची माघार 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपचे मोरवाडीचे प्रतिनिधीत्व करणारे केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकिता कदम यांनी माघार घेतल्याने घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. 

तुषार हिंगे यांनी 14 ऑक्टोबर  2020 रोजी तडकाफडकी उपमहापौर पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक झाली.  आज (शुक्रवारी) महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेत  निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. सव्वा अकरा वाजता अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी दिला होता. सभागृह नेते नामदेव ढाके, केशव घोळवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अर्ज माघार घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत कदम यांनी माघार घेतली.

उपमहापौरपदासाठी सोमवारी सत्ताधारी भाजपकडून केशव घोळवे यांनी अर्ज दाखल केला होता. पालिकेत भाजपचे बहुमत असल्याने त्याचवेळी त्यांची निवड निश्चित झाली होती. पण, संख्याबळ नसल्याचे आणि कोरोनाचे कारण देत नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती, विषय समिती सभापतीपदाची निवडणूक न लढविणाऱ्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली होती. पिंपरीगावाचे प्रतिनिधीत्व करणा-या निकिता कदम यांचा अर्ज दाखल केला होता. अखेरिस त्यांनी माघार घेतली. घोळवे यांची बिनविरोध निवड झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III