Pimpri : राज्य किमान वेतन सल्लागार मंडळावर कामगारनेते केशव घोळवे यांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक आणि कामगारनेते केशव घोळवे यांची महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय बुधवारी (दि. 14) राज्य सरकारने जाहीर केला. त्यामध्ये मंडळाच्या अध्यक्षांसह मालक, कामगार आणि स्वतंत्र प्रतिनिधींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या मंडळावर रघुनाथ बबनराव कुचिक यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

केशव घोळवे मागील अठरा वर्षांपासून कामगार चळवळींमध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्यांची एक जाणकार आणि अभ्यासू कामगार नेता म्हणून ओळख आहे. त्यांनी विदेशातील आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (आयएलओ), जागतिक परिषद, एशिया परिषद आदींमध्ये सभाग घेतला आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा राज्य सरकारला औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे किमान वेतन ठरविताना फायदा होणार आहे. त्यातूनच त्यांची या मंडळावर निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळातील सर्व सदस्य महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्रातील कामगारांच्या किमान वेतनाबाबत अभ्यास करून किमान वेतन दराबाबत आवश्यक सल्ला तसेच शिफारशी शासनाकडे सादर करणार आहेत. मालक प्रतिनिधीमध्ये सुबोध देऊळगावकर, राजेश दुबेवार, मकरंद देशपांडे, निरंजन परदेशी, राजीव सावरकर, निरंजन बोरसे, कन्हैयालाल शार्दूल, फईम पटेल, राजेश पेवल, योगेश मानधनी यांनी निवड करण्यात आली आहे.

कामगार प्रतिनिधी म्हणून राजेश गौतम, अॅड. शैलेश मुंजे, हरीश वाघ, प्रभाकर मते, राम साळगावकर, केशव घोळवे, सुशांत गायकवाड, हरी चव्हाण, दीपक ढाकणे, सुधाकर पाटील तसेच स्वतंत्र प्रतिनिधी म्हणून विश्वेश कुलकर्णी, अॅड. श्रीधर व्यवहारे, अमित सुडे, विक्रम नागरे, प्रतीक घोडे यांची निवड करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.