Khadaki : खडकीतील ‘ती’ जुनी पाण्याची टाकी अखेर जमीनदोस्त!

एमपीसी न्यूज – खडकी बाजारातील शेवाळे टॉवरजवळ असलेली जुनी पाण्याची टाकी आज (सोमवारी, दि. 13) अखेर तीन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर अखेर पूर्णपणे पाडण्यात आली. 9 जानेवारी रोजी या टाकीच्या पाडकामास सुरवात करण्यात आली होती.

सुरवातीला जेसीबीच्या सहाय्याने या टाकीचे तीन ते चार कॉलम काढण्यात आले होते. त्यामुळे टाकी धोकादायक बनली होती. कोणत्याही क्षणी ही टाकी कोसळण्याची शक्यता असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आज अखेर ही टाकी जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

खडकीतील नागरिकांच्या सोयीसाठी 1976 साली खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने ही बांधली होती. काही काही वर्षानंतर टाकीतून पाणी झिरपू लागले, त्यावर बोर्डाने अनेकवेळा उपाय करून टाकी गळण्याचे थांबवले होते. मात्र, टाकीचे अनेक ठिकाणी पोपडे निघू लागल्याने बोर्डाने टाकी अर्धवट भरण्याचे सुरू केले व खडकीत पाणीटंचाई भासू लागली.

त्यानंतर १९९६ साली ही टाकी पूर्णपणे पाणी भरण्यास बंद करण्यात आली आणि नेहरू उद्यान येथील २५ लक्ष लिटर च्या नवीन बनवण्यात आलेल्या टाकीतून खडकीला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. १९९६ पासून ही टाकी बंद अवस्थेत होती ती पाडण्यासाठी अनेक वेळा बोर्डाने निविदा मागवल्या होत्या मात्र निविदांची रक्कम मोठी असल्यामुळे बोर्डाने अनेक वेळा निविदा फेटाळल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.