Khadki News : करणीच्या नावाखाली झाडांना लटकवलेल्या काळ्या बाहुल्या अंनिसने काढल्या

एमपीसी न्यूज – पुण्यातील खडकी परिसरातील होळकर ब्रिजच्या खाली म्हसोबा मंदिराच्या आवारात असणाऱ्या झाडांना करणीच्या नावाने ठोकण्यात आलेल्या काळ्या बाहुल्या, बिबेे, फोटो, लिंबू, चिठ्ठ्या दाभण आणि खिळ्याच्या तसेच साळींदर पक्षाच्या काट्याच्या साह्याने झाडामध्ये ठोकण्यात आल्या होत्या.

करणी लावण्यासाठी किंवा करणी काढण्यासाठी म्हणून अशा अंधश्रद्धेचा उपयोग करून लोकांना फसवले जाते. अनिष्ट, अघोरी गोष्टी करून लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केले जात होते. या अंधश्रद्धेला आणखी कोणी बळी पडू नये. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हसोबा मंदिराच्या आवारातील झाडांना लावलेल्या हजारो काळ्या बाहुल्या काढून झाडांना मुक्त करण्यात आले.

गेली चार वर्षे सातत्याने अंनिसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव या गोष्टीचा पाठपुरावा करत असून याबाबत खडकी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार अर्जही देण्यात आला आहे. “जादूटोणा विरोधी कायदा” असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करणे जरुरीचे आहे. परंतु खडकी पोलीस ठाण्यातर्फे कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. अंधश्रद्धेचा प्रकार वाढू नये, म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्यातर्फे झाडाना ठोकलेल्या काळ्या बाहुल्या काढून जाळण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.