Khadki News: रेंजहिल्स येथील पोलीस चौकीमागील गार्डनची दुरवस्था

एमपीसी न्यूज – खडकी कॅन्टोन्मेंट विभागातील रेंजहिल्स येथील पोलीस चौकीमागील गार्डनची दुरवस्था झाली आहे. या गार्डनची दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड ब्लॉक उपाध्यक्ष सुजीत मस्के आणि सुमीत कदम यांनी निवेदनाद्वारे खडकी छावणी परिषदेकडे केली आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून हे उद्यान साकारण्यात आले आहे. मात्र, या उद्यानाच्या देखभालीकडे कॅन्टोन्मेंट अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. उद्यानाला टवाळखोरांचा अड्डा असे स्वरूप प्राप्त झाले आहे. याबाबत तक्रारी वाढत असतानाही दुरुस्तीला मुहूर्त लागत नसल्याची सद्यस्थिती आहे.

मोठा गाजावाजा करत नागरिकांच्या सोयीच्या उद्देशाने हे उद्यान साकारण्यात आले होते. मात्र, इथल्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कचऱ्याचे साम्राज्य, पसरलेली दुर्गंधी, लाखो रुपये खर्चून साकारलेली झालेली तुटफूट अशी मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे, असे सुजीत म्हस्के यांनी सांगितले.

या उद्यानातील खेळणी, बसण्याची बाके, पाण्यासाठी काढलेले बोअरवेल नादुरुस्त व गंजलेल्या अवस्थेत असून, गेल्या पाच वर्षापासून नागरिकांना व बालगोपाळांना या उद्यानाचा लाभ घेता येत नाही. गार्डन टाईप 4 या ठिकाणच्या उद्यानात लाखो रुपयांचे जिम साहित्य भंगार अवस्थेत पडलेले दिसून येत आहे. उद्यानातील साफसफाई अत्यावश्यक बनली आहे.

बोर्डाने ज्येष्ठ नागरिकांसाठी, मुलांसाठी खेळणी उपलब्ध करून द्यावी व व्यायामासाठी ओपन जिम साहित्य बनवून द्यावे, जेणेकरून या भागातील नागरिकांना उद्यानाचा लाभ घेता येईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.