Interview with Suraj Gurav: खाकीतला मावळा – अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव

एमपीसी न्यूज (अमर मणेरीकर) – आपण मावळा हा शब्द फक्त स्वराज्याचे रक्षक यांच्यासाठी वापरतो पण आजच्या काळात आपण पाहायला गेल तर शिवाजी महाराजांचे तसेच इतर अनेक गडकिल्ले सर करणारा तसेच आपल्या देशाची सेवा करणारा एक पोलीस खात्यातील मावळा यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. 

आपल्या पोलीस खात्याबद्दल आपण बरेच चांगल वाईट ऐकले आहे कोरोनाच हे सावट असताना आपल मनोबल वाढविण्यासाठी आमचे मुक्त पत्रकार अमर मणेरीकर यांनी एमपीसी वृत्तपत्राच्या वाचकांसाठी एका तडफदार व्यक्तिमत्त्वाची मुलाखत प्रसिद्ध करीत आहोत.

‘सूरज पांडुरंग गुरव’ अपर पोलीस अधीक्षक (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) त्यांना खाकीतला मावळा असे संबोधण्याचे कारण असे की, त्यांनी आतापर्यंत १६० किल्ले सरकेले आहेत व ते इथेच थांबले नाहीत तर त्यांचे पुढचे उद्दिष्ट असे आहे की त्यांना महाराष्ट्र, भारतच नव्हे तर संपूर्ण जगातले किल्ले सर करायचे आहेत. ही आवड जोपासण्याचा ते पूर्ण प्रयत्न करीत आहेत. त्यांची मूल सई आणि रुद्र त्याच आवडीने त्यांच्यासोबत किल्ले सर करतात. किल्ल्याबद्दलची माहितीसुद्धा ते जाणून घेतात. विशेष म्हणजे त्यांनी रात्री १ वाजता त्यांनी सदाशिवगड सर केला होता.

आता त्यांच्या कर्तव्याबद्दल बोलायचे झाल्यास, पोलिसांचे ब्रीदवाक्य असलेले ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’ त्यांच्या कामांमधून ते तंतोतंत पालन करताना दिसतात, त्याच कारण अस की पोलीस महासंचालकांचे Best Detection Award त्यांना देण्यात आले आहे.

कराडला पोलीस उपअधीक्षक असताना सूरज पांडुरंग गुरव यांनी कोरोनाच्या काळात चांगले काम करून गरजुंच्या मदतीपासून पोलिसांच्या सुरक्षेला पण त्यांनी प्राधान्य दिले. सगळ्यात पुढे होऊन काम करणाऱ्या गुरव यांनाही कोरोनाची बाधा झाली होती, त्रास कमी होता, दवाखान्यात गेलो तर बेड अडेल अशी भूमिका घेत त्यांनी गृह विलगीकरणाचा पर्याय निवडला

व त्यांच्यापासून प्रोत्साहित होऊन ७० शासकीय अधिकाऱ्यांनी गृह विलगीकरणाचा पर्याय निवडला होता. एकीकडे पोलीसिंग करतानाच दुसरीकडे त्यांनी कराडची माणुसकी हा ग्रुप तयार करून समाजातील गरजूंना, गोरगरीबांना चपलांपासून अन्नधान्यापर्यंत मदत करण्याचे कार्य समाजातील दानशूरांना, सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित करून केले त्यातून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली तर अशा व्यक्तिमत्त्वाला व पोलीस अधिकाऱ्याला छत्रपती शिवाजीमहाराजांचा मावळा नाही म्हणणार तर काय म्हणणार?

सूरज गुरव हे सध्या पुण्यामध्ये अपर पोलीस अधीक्षक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो या पदावर कार्यरत आहेत व त्यांची मुलाखत घेण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली.

१. फोर्स जाॅईन करण्याची प्रेरणा तुम्हाला कोणामुळे मिळाली

१९९८ ला मी १२ वी ला असताना त्यादरम्यान आदरणीय विश्वास नांगरे पाटील साहेब एक कर्तव्यदक्ष अधिकारी त्यावर्षी त्यांच सिलेक्शन झाल होत आणि त्यावेळेस आमच्या महाविद्यालयात त्यांच लेक्चर होत ते ऐकण्यासाठी गेलो होतो. खऱ्या अर्थान त्या दिवशी अस वाटल की पोलीस खात्यात आपल्याला प्रवेश मिळतो. त्याआधी काहीही माहिती नव्हती. कॉन्स्टेबलची भरतीच मला फक्त माहित होती त्यापुढील प्रक्रिया काही माहिती नव्हती. त्या दिवशी खऱ्या अर्थाने ठरवल पोलीस खात्यात जायचं. त्याच दृष्टीने पावल टाकली. सरांच मार्गदर्शन, त्याची प्रेरणा, यूट्युबवरील त्यांचे व्हिडिओ पाहून अभ्यास केला.

२. तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट कशाप्रकारे मिळतो?

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कुटुंब हा खूप मोठा आधारस्तंभ असतो. माझा एमपीएससी चा अभ्यास करताना किंवा इतर कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी माझी व माझी पत्नी संस्कृती गुरव (PI-ACB) यांनी मला सपोर्ट केला. अभ्यास करताना कधी डिप्रेशन आल तर पत्नी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. तू अधिकारी होणार हे आईच वाक्य मनोबल वाढवणारं होत.

३. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशाप्रकारे प्रोत्साहन देता

माझी मुल खूपच लहान आहेत मात्र त्यांच्या भवितव्याची सुरुवात आतापासूनच होणार आहे. मी माझ्या मुलांसाठी भरपूर वेळ काढतो कितीही हेक्टिक शेड्युल मधून दिवसातला थोडातरी वेळ कायमच काढतो. माणसाची जडणघडण ही निसर्गातच होत असते अस माझ मत आहे. मी नेहमी त्यांना माझ्याबरोबर किल्ल्यांवर घेऊन जातो, इतिहासातील छोट्या छोट्या गोष्टी सांगतो ,आजूबाजूचा परिसर दाखवतो त्याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या हातात संस्कार ही एकमेव गोष्ट अशी आहे जी आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. याव्यतिरिक्त आपण कोणत्याही गोष्टीसाठी मुलांवर दबाव आणू शकत नाही अशा मताचे मी आणि माझी पत्नी आहोत. प्रत्येक आई-वडिलांनी असेच असावे अस माझ वैयक्तिक मत आहे.

४. गिर्यारोहण करण्याची कल्पना कशी सुचली? आतापर्यंत एकूण सर केलेल्या किल्ल्यांपैकी आवडता व सर करण्यासाठी अवघड किल्ल्या कोणता?

श्रीमान् योगी पुस्तक पहिल्यांदा माझ्या वाचनात आलं. खऱ्या अर्थान शिवाजी महाराज हे अखंड भारताचे दैवत आहेत. मात्र शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला सुरुवात केली, गड-किल्ले फिरायला लागल्यावर काही प्रसंग आठवायला लागले. माझा इतिहास हा विषय असल्याने त्यात रुचीही आहे. संभाजी महाराजांच चरित्र, राजाराम महाराज, पेशवेंच चरित्र आणि यातून युद्धकला, किल्ल्यांवर घडलेल्या गोष्टी या सर्वांचा अभ्यास करता करता कधी आवड लागली कळलच नाही.

आजपर्यंत मी १६० किल्ले सर केले आहेत. ऑगस्ट २०१८ ला एवरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला, राजस्थानमधील जवळपास सर्व किल्ले पाहिले आहेत, कर्नाटकातील काही किल्ले पाहिले आहेत, गेल्याच महिन्यात जिंजी आणि वेल्लूरचा किल्ल्याही पाहून आलो कारण शिवाजी महाराजांनी जिंजीचा किल्ला, वेल्लूरचा किल्ला घेतला होता हे खूप दिवस ऐकल होत मात्र ज्या किल्ल्यांच्या आधारे मराठ्यांच बुडणार राज्य तरल गेल तो जिंजीचा किल्ला पाहायची खूप इच्छा होती ती इच्छा मी माझ्या मित्रांबरोबर जाऊन पूर्ण केली. माझी इच्छा आहे की जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत १००० किल्ले महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण जगातले किल्ले बघण्याची इच्छा आहे.

५. तुम्ही डिप्रेशनचा सामना कसा करता? आणि तुमच्या सहकाऱ्यांना व मित्रांना काय सल्ला द्याल की डिप्रेशनशी कस लढाई?

काम आहे म्हणजे कामाबरोबर ताण हा येतोच. माझे तीन जवळचे मित्र आहेत व आमचा एक ग्रुप आहे कोणतीही अडचण आली की आम्ही एकमेकांशी चर्चा करतो त्याचा फायदा असा की त्यातून निश्‍चितच मार्ग मिळतो. मला अस वाटत की माणसाच्या आयुष्यात मित्र असावेत. आपल्याला चांगल-वाईट दोन्हीही सांगणारे मित्र असावेत. आपली दु:ख व्यक्त करता आली पाहिजेत. जसा आनंद व्यक्त करतो तसच दु:ख पण व्यक्त करता आल पाहिजे.यासाठी सर्वात महत्वाच म्हणजे चांगले मित्र असणं आवश्यक आहे. माणसाच्या आयुष्यात छंद असायला पाहिजे. मला वाचनाचा छंद आहे त्याचबरोबर चित्रपट बघणे, गाणी ऐकणे,अलीकडेच वेबसेरीज् बघायला सुरुवात केली आहे. या सर्व गोष्टी असल्यावर डिप्रेशन असण्याचा प्रश्नच येत नाही.

६. तुमचा आवडता चित्रपट आणि गायक कोणता?

माझा आवडता चित्रपट Vertical Limit हिंदीमध्ये गंगाजल, खाकी

अलीकडेच मला अर्जित सिंगची गाणी खूप आवडतात.

७. युवकांना काय सल्ला द्याल प्रामुख्याने मुलींना?

उपदेश म्हणून नाही पण एक मैत्रीचा सल्ला म्हणून कोणतीही गोष्ट मिळवताना संयम ठेवण खूप गरजेच आहे. करिअर करताना संयम ठेवावाच लागतो. आपल्या आजूबाजूला इतक्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यातून स्वतःला सावरण्यासाठी संस्कार ही गोष्ट अतिशय गरजेची आहे व त्यासोबतच धाडसाची जोड असणे आवश्यक आहे. युवकांना माझा सल्ला असा आहे की पोस्टरवर असलेला दादा,अप्पा हे तुमचे आदर्श असता कामा नयेत. तुमचे आदर्श समाजासाठी उपयुक्त असणारे जे लोक आहेत असे लोक आदर्श असले पाहिजेत. प्रत्येक क्षेत्रात मुलींनी मुलांपेक्षा धीट व्हावे अस माझ मत आहे.

८. पोलिस प्रशासनात रुजू झाल्यावर आई-वडिलांची प्रतिक्रिया काय होती? ड्युटीचा पहिला दिवस कसा होता?

मी ज्यादिवशी DYSP म्हणून रुजू झालो त्यादिवशी माझी आई मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली तो एक योगायोगच होता. पण मी DYSP झालो तो आयुष्यातील एक सुवर्ण क्षण होता. सर्वांनाच आनंद होता कारण पोलिस खात्यात इथून मागच्या कोणत्याही पिढीमध्ये माझ्या घरात कोणीही पोलिस अधिकारी नव्हता. मी आणि माझी पत्नी संस्कृती गुरव पहिले पोलिस अधिकारी होतो याचा एक वेगळा आनंद घरात होता. माझ्या मनात काहीतरी वेगळ मिळवल्याची भावना होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.