Khalapur : द्रुतगती मार्गावर कार अपघातात अभिनेत्री शबाना आझमी जखमी

एमपीसी न्यूज- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोल नाक्याजवळ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाल्याने त्या व त्यांचा चालक जखमी झाला आहे. आज दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, शबाना आझमी या त्यांची टाटा स्ट्रिम गाडी क्र. (एमएच 02 सी झेड 5385) मधून पुण्याच्या दिशेने येत असताना खालापूर टोलनाक्याजवळ त्यांची गाडी समोरील ट्रक क्र. (एमएच 09 सीयु 8010) ला मागून धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये गाडीच्या मागील सिटवर बसलेल्या शबाना आझमी यांच्या डोळ्याला, नाकाला व तोंडाला मार लागला असून त्यांच्यावर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती ही स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे.

गाडीच्या स्टेअरिंगची एअर बॅग उघडल्याने चालक बचावला आहे. अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. शबाना आझमी यांच्या कारच्या मागेच दुसर्‍या गाडीत असलेले जावेद अख्तर हे देखिल तात्काळ घटनास्थळावर दाखल झाल्याने जखमी दोघांना तातडीने उपचाराकरिता रवाना करण्यात आले.

अपघाताची माहिती समजताच खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, महामार्गचे एस.एस. पूजारी यांनी घटनास्थळावर येऊन अपघाताची पाहणी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.