Pimpri News : खंडेनवमी; रोजी रोटी देणा-या यंत्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा

औद्योगिक नगरीत खंडेनवमी उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे) – पिंपरी-चिंचवड शहराला औद्योगिक नगरी अशी ओळख मिळालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे साडेसहा हजार लहान मोठे उद्योग आहेत. त्यामुळे शहरात खंडेनवमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  खंडेनवमी हा दिवस आश्विन शुक्ल नवमीला साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या व लघुउद्योगांमध्ये पारंपरिक पद्धतीने यंत्रपूजन करून कामगार खंडेनवमी साजरी करतात.

मागील वर्षी कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर खंडेनवमीला शस्त्रपूजन करता आले नाही. कंपनी मालक, पदाधिकारी आणि कामगारांमधील उत्सवाची भावना कमी झाली नव्हती. कोरोनाचे सावट यावर्षी कमी झाले असून यावर्षी मोठ्या प्रमाणात खंडेनवमी साजरी केली जात आहे. पूर्वी कामगारांच्या घरातील सदस्य खंडेनवमीच्या दिवशी कंपन्यांमध्ये यायचे. आपल्या घरातील व्यक्ती कुठे काम करतो, त्याच्या कामाचे स्वरूप काय, तसेच अन्य बाबी समजून घेतल्या जाव्या, घरातील सर्वांना कंपनीची तिथल्या कामाची आणि कामगारांची ओळख व्हावी या उद्देशाने खंडेनवमीच्या दिवशी ‘ओपन डे’ साजरा केला जात होता. ती परंपरा आता काहीशी कमी झाली आहे.

खंडेनवमी हा दिवस केवळ कामगार साजरा करत नाहीत तर कंपन्या देखील सहभाग घेतात. दिवाळीचा बोनस ही प्रत्येक कामगाराच्या आयुष्यातील आनंदाची पर्वणी आहे. या बोनसचे वाटप खंडेनवमी पासून सुरु होते. कामगारांना दिवाळीचा बोनस किती मिळणार हे या दिवशी जाहीर केले जात. दिवाळी प्रमाणे खंडेनवमीला तसेच बोनस मिळणा-या दिवशी कंपनीकडून कामगारांना मिठाईचे वाटप केले जात.

टाटा मोटर्सचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी मनोहर पारळकर टाटा मोटर्स मधील खंडेनवमी बद्दल सांगतात. खंडेनवमी पूर्वीच कामगार ते काम करत असलेल्या मशीनची स्वच्छता करत. खंडेनवमीच्या दिवशी मशीनची पूर्णपणे स्वच्छता केली जात. वरिष्ठ अधिकारी, कामगार मिळून कंपनीमधील मशिनरींची पूजा करत. कामगार आणि अधिकारी एकमेकांशी संपर्क करत त्यातून त्यांच्यातील सांघिक भावना वाढीस लागत असे. ज्या मशीनवर आपण निर्मिती करतो, ज्यावर कंपनीचा धंदा चालतो त्याची पूजा करणे ही चांगली भावना आहे. ती परंपरा टाटा मोटर्समध्ये आजही कायम आहे. त्यातला उत्साह कुठेही कमी झालेला नाही.

एसकेएफ कंपनीतील कामगार युनियनचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पणिचर म्हणाले, “खंडेनवमीच्या दिवशी दुपारी दोन ते चार वाजताच्या दरम्यान कामगार मशीनची स्वच्छता करतात. मशीनची पूजा करतात. पूर्वीच्या काही प्रथा बंद झाल्या आहेत. पूर्वी गुलाल उधळून खंडेनवमीचा आनंद साजरा केला जात असे. मात्र गुलाल मशीनमध्ये गेल्याने प्रोडक्शनच्या गुणवत्तेत फरक पडतो. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात गुलाल उधळला जात नाही. पूर्वीचा कामगार चाळीत राहत असे. ज्या कंपनीत तो काम करतो तिथले कामकाज कुटुंबियांना समजावे यासाठी खंडेनवमीच्या दिवशी कुटुंबियांना कंपनीत आणण्याची परवानगी होती. पण 1990 च्या दशकात ती प्रथा हळूहळू बंद झाली आहे. प्रोडक्शन प्रेशर आणि लॉस यांचा विचार करून केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून खंडनवमी साजरी केली जात आहे.”

राम नलावडे एसकेएफ कंपनीत मशीन शॉप या विभागात काम करत होते. सन 1998 साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. ते खंडेनवमी बद्दल बोलताना म्हणाले, “कंपनीत खंडेनवमीच्या अगोदर आठ दिवस स्वच्छतेला सुरुवात होत असे. मशीन धुणे, पुसणे, रंग तसेच सर्व विभागात रोषणाई केली जात होती. यानिमित्ताने मशीनची निगा राखली जात. मशीनचे ऑइलिंग आणि अन्य कामे देखील केली जात असत. कंपनी यासाठी आर्थिक मदतही करत असे. खंडेनवमीच्या दिवशी दोन तास अगोदर कामगारांना सुट्टी मिळत असे. वर्षातून एकदा बायका पोरांना कपनी बंघायला मिळत असे.”

माजी कामगार विनायक चक्रे म्हणतात, “कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार गणपतीसाठी गावी जात, दिवाळीला सुट्टी घेत. पण ज्या ठिकाणी काम करतो तिथे कोणताच उत्सव साजरा केला जात नसे. त्यामुळे एकीची भावना वाढीस लागण्यासाठी खंडेनवमीचा उत्सव सुरु झाला. खंडेनवमी निमित्त कष्टकऱ्यांच्या जीवनाचे साहित्य असलेल्या यंत्रांप्रती खंडेनवमीला कृतज्ञता व्यक्त केली जाते. पूर्वी सर्वसाधारणपणे सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन पर्यंत यंत्रांची स्वच्छता, पूजा केली जात. कंपनीत काम करणा-या कामगाराला एका विभागातून दुस-या विभागात जाण्यास परवानगी नसते. मात्र खंडेनवमी निमित्त कामगार सर्वत्र फिरून कंपनीची पाहणी करत. एकमेकांना शुभेच्छा देत. दुपारी साडेतीन वाजता कंपनीकडून मिठाई मिळत असे. मिठाई घेऊन गुलालात न्हालेले कामगार सायकलवरून आनंदाने घरी जात. खंडेनवमीच्या दिवशी औद्योगिक नगरीत गुलाबी वातावरण व्हायचे. दस-याच्या पार्श्वभूमीवर कंपनीत एक कमिटी स्थापन केली जात. त्या कमिटीमध्ये कंपनी आणि कामगारांचे प्रतिनिधी असत. कामगारांच्या प्रतिनिधींना विचारल्याशिवाय खंडेनवमीच्या सणाचा कोणताही खर्च कंपनी करत नसे. याचा कामगारांना आनंद होत. सन 1960 च्या दशकात कामगारांच्या कुटुंबियांना कंपनीत कंपनीतील कामकाज बघण्यासाठी येण्यास परवानगी मिळाली. मात्र कंपनीत काही ठिकाणी ऑईल सांडलेले असते. जमीन घसरडी झालेली असते. यंत्रे सुरु असतात यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. म्हणून कंपनीकडून एक मार्ग ठरवून दिला जात. त्या मार्गाने लोकांनी जायचे आणि कंपनी बघायची अशी प्रथा होती. या प्रथा काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कामगारांच्या कुटुंबियांना कंपनी पाहण्यासाठी प्रवेश दिला जात नाही.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.