Khed News : ग्रामसमृद्धी अभियान अंतर्गत मांजरेवाडीत 350 आंब्यांच्या झाडांचे वाटप

एमपीसी न्यूज – जीवनविद्या फाउंडेशन आणि महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लि. ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत मांजरेवाडीत 350 आंब्यांच्या झाडांचे वाटप करण्यात आले. रविवारी (दि. 26) मांजरेवाडी, खेड येथील तिन्ही वाडीच्या प्रत्येक घरात केशर आंब्यांच्या झाडांचे वाटप करण्यात आले.

या वृक्ष वाटप कार्यक्रमात जीवनविद्या मिशन पिंपरी भोसरी शाखेचे अध्यक्ष अमर गावडे यांच्या नेतृत्वाखाली जीवनविद्या मिशनचे 40 कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मांजरेवाडीच्या सरपंच अनिता विलास मांजरे, उपसरपंच गणेश माजरे, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सदगुरू वामनराव पै प्रणित आणि जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांच्या संकल्पनेतून ग्रामसमृद्धी अभियान राबविले जाते. या अभियान अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण हाच नारायण हा संदेश देत गावात 350 केशर आंब्यांच्या झाडांचे वाटप करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा आणि नदी शेजारील परिसरात 200 झाडांची लागवड करून त्यांना बांबूचे ट्रि-गार्ड बसविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.