Khed News: बेकायदा हत्यार बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

Khed News: One arrested for illegal possession of weapons पोलिसांनी कडूस येथील बिअर शॉपी जवळ सापळा लावला. एक तरुण पल्सर दुचाकीवरून तिथे आला. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

एमपीसी न्यूज – बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.9) सायंकाळी साडेसहा वाजता कडूस येथे करण्यात आली आहे.

कृष्णा व्यंकटेश कुलकर्णी (वय 26, रा. ब्राह्मणआळी, राजगुरूनगर ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी एलसीबीचे एक पथक पंचायत समिती, राजगुरूनगर येथे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना माहिती मिळाली की, कडूस येथील एका बिअर शॉपीजवळ एक तरुण हत्यार घेऊन दुचाकीवरून येणार आहे.

त्यानुसार पोलिसांनी कडूस येथील बिअर शॉपी जवळ सापळा लावला. एक तरुण पल्सर दुचाकीवरून तिथे आला. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी सुरा मिळून आला.

पोलिसांनी तरुणाला अटक करून त्याची दुचाकी व सुरा जप्त केला. त्याच्यावर खेड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कृष्णा याला पुढील कारवाईसाठी खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस कर्मचारी सुनील जावळे, शरद बांबळे, दीपक साबळे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.