Chakan : खेड तहसील समोर ठिय्या आंदोलन

जोरदार घोषणाबाजी;  कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचा सहभाग

एमपीसी न्यूज – पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांनी सोमवारी (दि.१०) खेड तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले.

यावेळी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते, खेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस, पुणे जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते निलेश कड-पाटील यांनी भाजप शासनाच्या कारभारावर सडकून टीका केली. यावेळी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीचे कैलास सांडभोर, कैलास लिंभोरे, कॉंग्रेसचे जमीर काझी, बाळासाहेब गायकवाड, मनसेचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. माजी आमदार मोहिते म्हणाले कि, वाढत्या महागाईसाठी भाजप सरकार जबाबदार आहे.

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ करून हे सरकार सामन्यांच्या खिशावर डल्ला मारत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. विजय डोळस यावेळी म्हणाले कि, भाजप शासनाने सामन्य नागरिकांना देशोधडीला लावले आहे. भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. निलेश कड-पाटील म्हणाले कि, 2014 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी आश्वासन दिले होते की, देशात दोन कोटी नोकर्‍या दरवर्षी तरुणांना मिळतील, पण उलटेच झाले. प्रतिवर्षी 20 लाख नोकर्‍या कमी झाल्या आहेत. तरुणांना काम नाही, गृहिणींना स्वयंपाकाचा गॅस नाही. इंधनाचे दर रोजच वाढत आहेत. विकास दर वाढत असल्याची जाहिरात करता तशी इंधन दर रोजच वाढत असल्याचे सरकारी फलकही लावा अशी खरमरीत टीका निलेश कड-पाटील यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.