Khopali news: खोपोलीत 50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू होणार; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

एमपीसी न्यूज  – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने खोपोलीत लवकरच 50 बेडचे कोविड केअर सेंटर चालू होणार आहे. त्यासाठी कंपनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आर्थिक सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर बेडची सुविधा असलेले 50 बेडचे सेंटर लवकरच सुरू होणार आहे.

खोपोली येथे 50 बेडचे कोविड केअर सेंटर उभे करण्यासाठी खालापूर तालुक्यातील कंपनी असोसिएशनची  खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली खालापूर तहसिल कार्यालय येथे आज (मंगळवारी) बैठक झाली. या बैठकीस आमदार महेंद्र थोरवे,   तहसिलदार ईरेश चपलवार, कंपनी असोसिएशनचे  व्यवस्थापन, पदाधिकारी,पोलिस आधिकारी उपस्थित होते.

याबाबतची माहिती देताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, खोपोलीत 50 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महेंद्र थोरवे 50 लाखांचा आमदार निधी देणार आहेत. कोरोना कालावधीत मनुष्यबळ आणि कोविड सेंटर चालविण्यासाठी येणारा खर्च, औषधे याचा खर्च कंपनी असोसिएशनने द्यावा. एक रुग्णवाहिका आणि एक शववाहिनी, 15 व्हेंटिलेटर देण्यात यावेत, अशी मागणीअसोसिएशनकडे  केली. याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

कोविड केअर सेंटर चालविण्यासाठी जो  आर्थिक खर्च येईल,  तो देण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी होकार दिला.  खोपोली नगरपंचायतीच्या वतीने पाणी, इतर सुविधा देण्याचे मान्य केले. त्यामुळे लवकरच खोपोलीत 50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे.

दरम्यान, या बैठकीनंतर खोपोली, खालापूर परिसरातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांची खासदार बारणे यांनी बैठक घेतली. कोविड सेंटर चालू व्हावे यासाठी सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी मागणी केली होती. त्याअनुषंगाने सर्वपक्षीय पदाधिकऱ्यांची बैठक घेतली. खोपोलीच्या नगराध्यक्षा, मुख्यधिकारी, सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. सर्वांनी कोविड केअर सेंटरला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.