Pune : दोन कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना सहा तासांत अटक

एमपीसी न्यूज – झटपट श्रीमंत होण्यासाठी मार्केटयार्ड येथील व्यापाऱ्याचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तीन तरुणांना पुणे पोलिसांनी सहा तासांमध्ये अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी आरोपींकडून दीड कोटीची रोकड, गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्युनर कार आणि एक दुचाकी असा एकूण पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

अजय बाळासाहेब साबळे (वय-24), सुजित किरण गुजर (वय-24), ओंकार श्रीनाथ वाल्हेकर (वय-20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील अजय साबळे हा मुख्य सूत्रधार आहे. तर याच गुन्ह्यातील चौथा आरोपी अमित पोपट जगताप (वय-20) हा फरार आहे. त्यांनी कांतीलाल गणात्रा (वय-65 रा. सिटी पार्क सोसायटी, मार्केट यार्ड) या व्यापाऱ्याचे अपहरण केेले होते.

सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांतीलाल गणात्रा हे गुरुवारी रात्री घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचे फॉर्च्युनर कारमधून अपहरण केले. प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका नागरिकाने घटनेची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला दिली. या माहितीच्या आधारे मार्केटयार्ड पोलिसांनी गणात्रा यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्याच दरम्यान आरोपींनी कांतीलाल गणात्रा यांच्या मोबाईलवरून मुलाला फोन करून दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली. तसेच पोलिसांना माहिती सांगितल्यास गणात्रा यांना ठार मारण्याची धमकी दिली. आणि खंडणीची रक्कम घेऊन चांदणी चौकात घेऊन येण्यास सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी चांदणी चौकात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. यावेळी पैसे स्वीकारताना सुजीत गुजर आणि ओंकार वाल्हेकर या दोघांना अटक केली मात्र मुख्यसुत्रधार अजय साबळे आणि अमित जगताप हे खंडणी देण्यासाठी आणलेली दीड कोटीची रक्कम घेऊन फॉर्च्युनर गाडीतून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडे अधिक चौकशी केली आणि शोध घेऊन अजय साबळे याला अटक केली. आरोपींनी पैसे मिळाल्याची खात्री झाल्यानंतर कांतीलाल गणात्रा यांना खेड शिवापूर येथील शिंदेवाडी येथे सोडून दिले. आरोपींकडे चौकशी सुरु असून त्यांनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.