Pune News : सचिन पाटील नावाने पुण्यातील लॉजवर राहत होता किरण गोसावी; सापळा रचून पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज : अनेक दिवसापासून फरार असलेल्या किरण गोसावी याला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली. बुधवारी मध्यरात्री कात्रज परिसरातील एका लॉजमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. या लॉजमध्ये तो सचिन पाटील या नावाने राहत असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्याला अटक केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

अमिताभ गुप्ता म्हणाले, किरण गोसावीला पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली होती. वेगवेगळ्या राज्यात जाऊन त्याचा शोध घेतला जात होता. परंतु तो सापडत नव्हता. पुणे पोलिसांचे एक पथक लखनऊ फत्तेपूर लोणावळा या ठिकाणी त्याच्या शोधात गेले होते. परंतु तो सापडला नव्हता. त्यानंतर बुधवारी तो कात्रज परिसरातील एका लॉजवर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या एका पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.

एनसीबी प्रकरणात किरण गोसावीचे नाव आल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस देखील जारी केली होती. त्यामुळे किरण गोसावी ला मुंबई पोलीस किंवा एनसीपी च्या ताब्यात देण्याआधी पुण्यातील गुन्ह्याचा तपास केला जाईल आणि त्यानंतरच इतरांच्या ताब्यात सोपवली जाईल अशी माहिती गुप्ता यांनी दिली.

किरण गोसावीवर आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. त्याची पार्श्वभूमी एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी आहे. परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने तो तरुणांची फसवणूक करायचा. याशिवाय इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय देखील तो करायचा. स्टॉप क्राईम ऑर्गनायझेशन या नावाने देखील तो एक संस्था चालवतोय अशी माहिती समोर आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.