Kishor Aware Birthday: मोठ्या मनाचा, हळवा माणूस… किशोरभाऊ आवारे!

एमपीसी न्यूज – किशोरभाऊ आवारे हे तळेगावमधील माणसा-माणसाच्या मनामध्ये घर करून बसलेलं आणि सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व! अशा मोठ्या मनाच्या  परंतु हळव्या माणसाविषयी मनात घर करणाऱ्या आणि काळजात साठवलेल्या काही आठवणी. किशोरभाऊ आवारे यांचा 19 नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असल्याने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर करून भाऊंना शब्दरुपी शुभेच्छा देण्यासाठी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांचा हा विशेष लेख…
————————————————————
मोठ्या मनाचा,  हळवा माणूस… किशोर आवारे! 

लेखक – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे

किशोरभाऊ आवारे यांचे वडील गंगाराम आवारे व आई सुलोचनाताई आवारे यांना तीन अपत्य. मोठे रवींद्र आवारे, बहीण उज्वलाताई भोइने, सर्वांत लहान व आवडते किशोरभाऊ!वडील गंगाराम आवारे हे उच्चशिक्षित होते.

भारत फोर्ज  कंपनीत ते नोकरीला होते. युनियन लीडर म्हणून कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी योगदान दिले, परंतु कंपनीच्या जाचक अटी व शर्ती न पटल्याने तसेच भांडवलशाही विरुद्ध राग असल्याने गंगाराम आवारे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा आपल्या कुटुंबाला त्यांनी दिशा देण्याचे काम केले. कुटुंब सावरण्याचा प्रयत्न केला. किशोरभाऊ आवारे यांच्या मातोश्री सुलोचनाताई आवारे या विद्यमान नगरसेविका असून नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा आहेत. त्या अत्यंत कडक शिस्तीच्या आणि परखड  स्वभावाच्या आहेत.

घरातील वातावरणामुळे किशोरभाऊ आवारे यांच्यामध्ये जन्मजातच समाजसेवेचे गुण आई-वडिलांकडूनच प्राप्त झाले आहेत. कुटुंबातूनच समाज कार्याचे बाळकडू मिळाले आहे. त्यांचे बंधू रवींद्र आवारे देखील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक व शिक्षण मंडळ सभापती होते.

भाऊंचे मूळगाव मावळ तालुक्यातील पाचाणे- पुसाणे असून कर्मभूमी तळेगाव आहे. पाचाणे, पुसाणे गावच्या त्याकाळच्या सरपंच  कै. शांताबाई हरीभाऊ आवारे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची आजही नागरिक आठवण काढतात. वहिनी सुरेखाताई आवारे या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरसेविका होत्या.

सामाजिक व राजकीय वारसा

किशोरभाऊ आवारे यांना तीन मामा. मामांचे देखील राजकारणात व समाजकारणात भरीव योगदान आहे. सन्माननीय रामदास काकडे हे अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. नुकतेच त्यांनी तळेगाव येथे कॅन्सर रुग्णालय उभारणी संदर्भात बहुमूल्य कार्य केले आहे. त्यामुळे सामाजिक व राजकीय वारसा किशोरभाऊंना घरातूनच मिळाला आहे.

किशोरभाऊंचे शिक्षण तळेगावमधील ख्यातनाम अॅड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरमध्ये झाले. घरातच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची परंपरा  असल्याने भाऊंनी अनेक गोरगरिबांना न्याय दिला आहे. आज किशोरभाऊ आवारे हे यशस्वी उद्योजक म्हणून मावळ तालुक्यात ओळखले जातात.

सुरुवातीच्या काळात डबर व वीटभट्टी चालक म्हणून त्यांनी काम सुरू केले. अतिशय काबाडकष्ट  करत त्यांनी आजचे हे यशाचे शिखर गाठले आहे. यशाच्या शिखरावर सुद्धा अत्यंत नम्र राहून आपल्या जवळच्या साथीदारांना तळहाताच्या फोडासारखे जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे किशोरभाऊ आवारे!

समाजकारणाच्या पायामुळे राजकारणातील अढळ स्थान

राजकारण हा त्यांचा पिंड नसून गोरगरीब, युवा कार्यकर्त्यांना राजकारणात यशस्वी करण्यासाठी भाऊ अहोरात्र मेहनत करतात. राजकारणात त्यांना कुठल्याही पदाची अपेक्षा नाही तसेच भविष्यात राजकीय महत्त्वाकांक्षा  देखील नाही. असे असूनही भाऊंचे स्थान मावळ तालुक्यातील राजकारणात हे सदैव आढळ राहील.

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात आली. आकस्मात पुणे जिल्ह्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली. रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सीजन बेड, रेमडिसिवर, प्लाझमाची अत्यंत आवश्यकता भासू लागली. सरकारी यंत्रणा कोलमडली किंवा कमी पडू लागली.करोनाने अक्षरशः हाहाःकार माजवला होता.

अशात कुठलीही सरकारी यंत्रणा हाताशी नसताना  एक माणूस गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी आणि मदतीसाठी स्वतःची पदरमोड  करून आपल्या  काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आरोग्य यंत्रणेला सोबत घेऊन आरोग्य सेवा राबवू लागला. गोरगरीब कोरोना रुग्णांच्या पाठीशी देवदूत म्हणून उभा राहिला तो देवदूत म्हणजेच किशोरभाऊ आवारे होय.

जन्मोजन्मीचा ऋणानुबंध

माझी आणि किशोरभाऊ यांची ओळख तशी कमीच. तेही महाविद्यालयाच्या काही कामानिमित्ताने. गोरगरीब विद्यार्थ्यांना इंद्रायणीसारख्या नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी माझ्याकडे आलेले भाऊ तेवढाच काय तो आमचा परिचय! परंतु त्यांच्याशी बोलल्यानंतर, त्यांच्या विचारांची खोली आणि जन्मोजन्मीचा ऋणानुबंध असल्याचं मला नेहमी जाणवत राहिले.

त्यांच्या विचारांची खोली माझ्यासारख्या प्राचार्याला थक्क करणारी वाटते. आपले मत ठामपणे मांडणारा निर्भिड आणि स्पष्टवक्तेपणा असलेला हा माणूस मला सतत खुणावत राहिला. कुठल्याही जातीपातीचा, धर्माचा, पंथ, पंक्तीचा भेदाभेद  न मानणारा हा मनुष्य मला आदर्श वाटू लागला.  गोरगरीबांसाठी सामर्थ्य पणाला लावणारा हा मनुष्य आगळा वेगळा असल्याचे आढळून आले ते एका प्रसंगातून!

माझी सख्खी मोठी बहीण मंगल गोरख गाडे, चाकण येथे वास्तव्यास असून तिला अचानक कोरोनाची लागण झाली. या दुसऱ्या लाटेत ती वाचते की नाही अशी हलाखीची स्थिती निर्माण झाली. ताप वाढलेला, अंगात त्राण नाही. श्वास थांबतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली. कुठे रेमडिसिवर मिळेना, प्लाझ्माचा तुटवडा, बेड मिळेना, अशा स्थितीत माझ्यासमोर या प्रसंगातून वाचवणारा एकमेव माणूस डोळ्यासमोर आला आणि तो म्हणजे किशोरभाऊ आवारे!

बहिणीला जीवनदान मिळाले भाऊंमुळेच!

मी किशोरभाऊंना त्या क्षणी माझा विद्यार्थी मिलिंद अच्युत यांच्या माध्यमातून संपर्क साधला. क्षणाचाही  विलंब न लावता त्यांनी स्पर्श हॉस्पिटल येथे बेड उपलब्ध करून दिला. हा काळ असा होता की, कुठेही बेड मिळत नव्हता. सर्व हॉस्पिटल धुंडाळून काढली. कुटुंब चाकण येथे अडकले असताना, सर्वजण लाडक्या बहिणीला वाचवण्यासाठी तळमळ करीत असताना स्वतः किशोरभाऊंनी पुढाकार घेऊन माझ्या बहिणीचे प्राण वाचवले, हे त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही.

काळजाला स्पर्श करुन जाणारा आणि माझ्या कुटुंबासाठी आयुष्यभर स्मरणात राहील, असाच हा भाऊंचा स्पर्श होता! भाऊंनी माझ्यासारख्या अशा अनेक कुटुंबांना मदत केली आहे. अनेकांचे प्राण वाचवले, अनेकांची कुटुंब सावरली आहेत. त्यांच्या या थोर कार्याचा साक्षात परमेश्वराला सुद्धा हेवा वाटेल.

मातृदिनाची हृद्य आठण

असाच एक काळजाला भिडणारा आणि माझ्या सारख्या लेखकाचे अंतःकरण सुन्न करून सोडणारा प्रसंग तळेगावमध्ये घडला. तळेगावातील एक व्यक्ती आपल्या जन्मदात्री आईला कोरोनाचे उपचार मिळावे यासाठी एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करते. काही दिवसांनी त्याला आपल्या आईच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च पेलवेनासा होतो. त्यामुळे ती व्यक्ती पैसे नसल्यामुळे आपल्या आईचे पुढील उपचार बंद करावे, अशी हॉस्पिटलला विनंती करते.

ही गोष्ट किशोरभाऊंना समजताच ते ओक्साबोक्सी रडू लागतात. त्यांचे अंतःकरण पिळवटून निघतं. मग रात्रंदिवस मेहनत पणाला लावून त्या मातेला जीवदान दिले जाते. मातृदिनी घडलेला हा प्रसंग आजही अंगावर शहारे आणतो. मावळवासीयांच्या अंतःकरणात  ही घटना रुतून बसल्याशिवाय राहणार नाही.

गोरगरीब, वंचित नागरिकांना न्याय मिळावा या हेतूने  भाऊंनी जनसेवा विकास समितीची स्थापना केली. जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून  तळेगाव स्टेशन परिसराचा कायापालट करण्याचा अनोखा प्रयत्न करून दाखवला. कोरोना काळात गोरगरीब, कामगार, विद्यार्थी घरामध्ये बसून होते. अनेक कुटुंब बेरोजगार झाली होती. अशा गोरगरीब कुटुंबांना किशोर भाऊंनी दोन तीन महिन्यांचा किराणा, भाजीपाला भरून दिला.

गोरगरीबांसाठी जनसेवा थाळी, कोरोना प्रतिबंधक लसीकरण

परप्रांतीय तसेच गोरगरीब मजुरांच्या जेवणाचे हाल होऊ नयेत यासाठी तळेगाव स्टेशन-मराठा क्रांती चौक येथे पाच रुपयांत जनसेवा थाळी  देऊन पोटभर जेवण  उपलब्ध करून दिले. कोरोनाची लाट संपूनही भाऊंनी आजही स्वखर्चातून व तळेगावातील अनेक दानशूर लोकांच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी सुरू ठेवला आहे.

मार्च- एप्रिल महिन्यात कोरोना प्रतिबंधक लस भारतामध्ये उपलब्ध होऊ लागली. भाऊंची दूरदृष्टी सखोल असल्याने भाऊंनी संभाव्य परिस्थिती ओळखून तळेगाव शहरातील फेरीवाले, भाजीवाले, भाजी मंडईतील फळविक्रेते, रिक्षावाले मजूर, कामगार, सफाई कामगार यांना प्रथम लस मिळावी यासाठी प्रयत्न केले.

भाऊंनी स्वखर्चातून सुरवातीच्या एक महिन्यात जवळ जवळ दहा हजार नागरिक बांधवाना, महिलांना व जेष्ठ नागरिकांना लसीकृत केले. माणुसकीच्या या नात्यामुळे आजही मावळमधील, तळेगावमधील अनेक माता-भगिनी भाऊंची आठवण काढतात . आणि भविष्यातही काढत राहतील.

कोरोना निर्बंध शिथिल होत असताना दुकानांच्या बाहेर गर्दी जमू लागली. हे सर्वप्रथम भाऊंच्या लक्षात आलं. पुन्हा अशी गर्दी जर जमायला लागली तर संसर्ग झपाट्याने होऊ शकतो. त्यासाठी त्यांनी एक योजना आखली. दोन-दोन फुटांवर खडूचे रिंगण आखले. ही रिंगण आखायची योजना  सर्वप्रथम भाऊंच्या कल्पनेतून आली व ती सर्वदूर पसरली. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण अत्यंत कमी होऊ लागले. याचे सर्व श्रेय भाऊंना गेल्याशिवाय राहत नाही.

सदैव जनसेवकाची भूमिका

किशोरभाऊंनी लोकांसाठी, कामगारांसाठी, त्यांना न्यायहक्क मिळावा म्हणून अनेक आंदोलने केली व ती यशस्वी झाली. वरवर पाहता किशोरभाऊ अत्यंत तापट रागीट स्वभावाचे भासतात. परंतु विषयाच्या मुळाशी गेल्यानंतर, माझ्या सारख्या विचारवंताला किशोरभाऊ आवारे हे एक जनसेवक वाटू लागतात.

कुठल्या व्यक्तीविषयी, संस्थेविषयी किंवा हॉस्पिटलविषयी त्यांच्या मनात कधीही आकस राहत नाही. तेवढ्या प्रसंगापुरता लोकांना न्याय देण्यासाठी भाऊंचा आक्रमक पवित्रा असतो. परंतु त्यांचं लोकहिताचे काम पार पडलं व गोरगरीब, शोषित, वंचित बांधवाना न्याय मिळाल्यानंतर संपूर्ण राग  भाऊ कुठल्या कुठे विसरलेले असतात आणि महान व्यक्तिमत्त्वाची हीच खरी नांदी असते, ओळख असते.

किशोरभाऊंनी वेळोवेळी केलेली आंदोलने वेगळ्या वैचारिक पातळीवरती लढलेली असतात. अशा वेळी आपल्याला साने गुरुजींच्या आंदोलनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सध्यातरी मावळ तालुक्यात गोरगरीब, वंचित समाजासाठी काम करणारी एकमेव व्यक्ती खुणावतेय ती व्यक्ती म्हणजे किशोरभाऊ आवारे!

तळमळीचा नेता, कुशल संघटक

जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून काम करीत असताना किशोरभाऊंना कार्यकर्त्यांची मोठी फळी सदैव साथ देत असते. कार्यकर्त्यांसाठी भाऊ देखील कुठलीही गोष्ट कमी करीत नाहीत. कुणाला व्यवसाय उभारणीसाठी मदत कर, कुणाला कौटुंबिक अडचणीत मदत कर, तर कुणाला वैद्यकीय मदत कर. भाऊ प्रत्येकाला सढळ हाताने मदत करीत असतात. त्यामुळे किशोरभाऊ आवारे व कार्यकर्ते एकदिलाने, एक कुटुंब म्हणून मिळून-मिसळून राहतात. मावळ तालुक्यात कुणालाही कसलीही अडचण येवो. भाऊ तत्परतेने सदर अडचण सोडवण्यासाठी जीवाचे रान करतात.

नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळावे, यासाठी भाऊंनी कामगार बांधवांसाठी लढा दिला आहे. मावळ तालुक्यातील रहिवासी बांधवांना टोल भरावा लागू नये, यासाठी भाऊंनी केलेली आंदोलने सर्वपरिचित आहेत.

दिव्यांग बांधवाना हक्काचे वेतन नियमित मिळावे यासाठी भाऊंनी लढा दिला होता. दिव्यांग बांधवानसाठी न्याय हक्काचे व्यापारी संकुल उभे रहावे अशी भाऊंची सतत मागणी असते.

संकट समयी धावून जाणारे किशोरभाऊ

चिपळूण येथील महापुरात कोकणवासीयांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. किशोरभाऊंनी तळेगावकर नागरिकांना मदतीची साद घालून मोठ्या प्रमाणात अन्न धान्य तसेच पिण्याचे पाणी सर्वात प्रथम पाठवले होते.

कोल्हापूर पुराच्या वेळेसही दोन वर्षांपूर्वी भाऊंनी बारा ट्रक अन्न-धान्य, कपडे, पाणी व खाण्याची चिक्की अनेक दानशूरांच्या माध्यमातून व लायन्स क्लब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत पाठवली होती. अशी दानशूर व सेवाभावी वृत्ती भाऊंच्या रक्तातच असल्याने ते क्षणाचाही विलंब न करता मदतीस तत्पर असतात.

शहराच्या विकासाचे ‘व्हिजन’

नगर परिषदेच्या माध्यमातून भाऊंनी अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. अनेक यशस्वी प्रकल्पांची व उद्यानांची निर्मिती भाऊंच्या संकल्पनेतून झाली आहे. तळेगाव स्टेशन परिसरातील सुसज्ज भाजी मंडई ही भाऊंचीच संकल्पना आहे.

तळेगाव शहराविषयी भाऊंना विलक्षण प्रेम आहे. शहराचा कायापालट व्हावा, हीच भाऊंची प्रखर इच्छा असल्याने भाऊ सतत् विकासाची निरंतन स्वप्न बघतात व त्यांच्या पूर्ततेसाठी अहोरात्र मेहनत करतात.

भाऊंच्या बाबतीत घडलेला आणखी एक प्रसंग सांगितल्याशिवाय हा लेखनप्रपंच पूर्ण होऊ शकत नाही. मावळ तालुक्यातील एक भगिनी कोरोना उपचारासाठी तळेगावातील एका नामांकित हॉस्पिटलच्या बाहेर तडफडत असल्याचा फोन भाऊंना येतो. भाऊ क्षणाचाही विलंब न लावता त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. परंतु दुर्दैवाने सदर महिलेचा दुसऱ्या दिवशी अंत होतो. भाऊंनी या संदर्भात केलेले आंदोलन मावळ तालुक्याला ज्ञात आहे.

माझ्यासारख्या विचारवंताला नेहमी प्रश्न पडतो की, सर्व आर्थिक परिस्थिती समृद्ध व चांगली असताना भाऊंना आंदोलने का करावीशी वाटतात?परंतु विचार केल्यानंतर लक्षात येते की आज बोथट झालेल्या, निर्ढावलेल्या समाजव्यवस्थेला व यंत्रणेला जाग आणायची असेल, त्यांना जर वेळीच वठणीवर आणायचे असेल तर असे किशोरभाऊ प्रत्येक मातेच्या पोटी जन्माला यावे, अशीच भाऊंच्या जन्मदिनी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

किशोरभाऊंना माझ्यावतीने व तमाम मावळातील जनतेच्या वतीने वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो व हा लेखन प्रपंच येथेच थांबवतो.

– डॉ संभाजी मलघे, 
प्राचार्य, इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे.
संपर्क क्र. 83084 19610

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.