Kishore Aware : जनतेचे रक्षण करण्याचे बंधन जोपासणारा नेता म्हणजेच किशोर आवारे

एमपीसी न्यूज : सुमारे तीन वर्षांपूर्वी अकस्मात जगावर कोव्हिड रुपी महामारीचे संकट निर्माण झाले. सर्व विश्व ठप्प होऊन या जागतिक महामारीच्या संकटाशी सामना कसा करावा या विवंचनेत होते. सर्व जनजीवन ठप्प होऊन एकाच जागी खिळवून बसले होते. विश्वाच्या इतिहासात अखंड मानव जातीला घरात खिळवून ठेवणारी महामारी म्हणजेच करोना व्हायरस होय. कोव्हिडं मध्ये प्रत्येकाने आपापल्या जवळील प्रियजन दगावल्याचे आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. प्रत्येक मनुष्य जीवन मरणाच्या अस्थिरते बरोबरच अन्न, वस्त्र, निवारा व आर्थिक संकटांचा सामना करताना प्रत्येकाने अनुभवले आहे. कोव्हिडं रुपी भस्मासुराचा सामना करण्यासाठी प्रत्येक जण घरात बसला असताना, मनुष्याच्या आयुष्याची प्राणज्योत निरंतर तेवत ठेवण्यासाठी आपल्या शहरावर व शहरातील नागरिकांवर प्रेम करणारा एक नेता अखंड व अविरतपणे धडपडताना दिसून आला तो नेता म्हणजेच किशोर आवारे (Kishore Aware) होय.

जनतेच्या संरक्षणाचे बंधन आजन्म जोपासणारा नेता म्हणून किशोर भाऊंचे कार्य थक्क करणारे आहे. खरंतर आपत्ती काळात कुठलेही राजकारण करू नये, बहुतेक सर्वच राजकारणी मंडळी अंडरग्राउंड झाली असताना, स्वतःची व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या तूटपुंजा कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हॉस्पिटलमध्ये कोव्हिडंच्या रुग्णांना ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यासाठी अखंड व अहोरात्र परिश्रम केल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. तळेगाव शहरातील गरजू कुटुंबीय फेरीवाले, किरकोळ दुकानदार, भाजी विक्रेते, रिक्षा चालक, बांधव टेम्पो चालक बांधव तसेच परप्रांतीय गरजू नागरिकांना कोव्हिडं काळात नियमितपणे किशोर भाऊ भाजीपाला व किराणामाल उपलब्ध करून देत होते. परराज्यातील नागरिकांसाठी राहण्याची व जेवणाची स्वतंत्र व्यवस्था करून देत होते. कुठलीही सरकारी यंत्रणा हाताशी नसताना कुठलाही शासकीय पदभार नसताना आपल्या निवडक कार्यकर्त्यांच्या साथीने व स्वतःची आर्थिक पदरमोड करून किशोर भाऊंनी केलेले कार्य अनन्यसाधारण आहे.

राजकारणापलीकडे जाऊन आपल्या शहरातील नागरिकांच्या प्रती असणारी आस्था किशोर भाऊंच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. कोव्हिडं मुळे प्रत्येक कुटुंबावर फार मोठा आघात झालेला दिसून येतो. माणसातील माणुसकी हिरावल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत होते. कोव्हिडं मुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे पार्थिव नातेवाईक हॉस्पिटलमध्ये सोडून जात होते. या सर्व पार्थिवांचे किशोर भाऊ विधिवत अंत्यसंस्कार करत होते. दिवसाला दहा ते पंधरा पार्थिवांचे अंत्यसंस्कार भाऊंनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहेत. माणूस माणसापासून दुरावत असताना किशोर भाऊंची टीम सकारात्मक ऊर्जा घेऊन तळेगाव येथील नागरिकांची तसेच कोव्हिडं रुग्णांची (Kishore Aware) काळजी घेत होते.

आपल्या शहरातील नागरिकांसाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणारा आपले मत ठामपणे मांडणारा तसेच निर्भीड आणि स्पष्ट वक्तेपणा असणाऱ्या किशोरभाऊंची कार्यपद्धती थक्क करणारी होती. कुठल्याही जातीपातीचा धर्माचा पंथपंक्तीचा भेदाभेद न मानणारा हा नेता इतरांपेक्षा सच्चा व आदर्श वाटू लागला. गोरगरिबांसाठी तसेच गरजूंसाठी रात्री आपरात्री परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपले सामर्थ्य पणाला लावणारा हा मनुष्य निश्चितच अत्यंत आगळावेगळा व सच्चा आहे, त्याच्या सच्चेपणाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजेच जनसेवा थाळी. गरजू व पीडित नागरिकांसाठी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नाममात्र पाच रुपयात मराठा क्रांती चौक येथे हक्काचे पोटभर जेवण जवळ जवळ वर्षभर मिळण्याची व्यवस्था किशोर भाऊंनी जनसेवा थाळीच्या माध्यमातून केली होती. जनसेवा थाळीची दखल संपूर्ण महाराष्ट्र राज्याने घेतल्याचे सर्वांना ज्ञात आहे. कोव्हिडं प्रतिबंधक लस स्वखर्चातून सुरुवातीच्या काळात किशोर भाऊंनी उपलब्ध करून दिली. जवळजवळ दहा हजार लाभार्थी नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून काम करीत असताना किशोर भाऊंना कार्यकर्त्यांची मोठी फळी सदैव साथ देते ,भाऊ प्रत्येक कार्यकर्त्याला तसेच प्रत्येक गरजू नागरिकाला सढळं हाताने मदत करत असतात. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माध्यमातून किशोर भाऊंनी विविध प्रकल्प राबवले आहेत. तळेगाव स्टेशन परिसरातील भुयारी गटारी योजना असो, कॉलनी अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण असो, ट्रीट लाईट योजना असो, व नियमित पाणीपुरवठा असो या सर्व सुविधांचा पाठपुरावा सातत्याने घेताना किशोर भाऊ आढळून येतात. जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगाव स्टेशन येथे भव्य व अत्याधुनिक स्वरूपातील उद्यान म्हणजेच किशोर भाऊंच्या कल्पकतेचाच एक भाग म्हणावा लागेल. मराठी भाषेतील ज्येष्ठ लेखक व दुर्गप्रेमी कै.गो.नी. दांडेकर उद्यान असे नाव आनंदनगर उद्यानाला देण्यासाठी किशोर भाऊंचा पाठपुरावा सुरू आहे. तळेगाव स्टेशन येथील यशवंत नगर येथे एकूण बारा एकर क्षेत्रात भव्य असे बॉटनिकल गार्डन किशोर भाऊंच्या कल्पकतेतून साकार झालंय.

सदर बॉटनिकल गार्डन येथे भव्य वॉकिंग ट्रॅक साकारण्यात आला असून विविध प्रकारच्या पक्षांना आकर्षित करेल अशी निसर्ग संपन्न वृक्षसंपदा सदर गार्डनमध्ये पाहायला मिळणार आहे. तळेगाव स्टेशन परिसरातील नागरिकांना स्वस्त स्वरूपात भाजीपाला प्राप्त व्हावा यासाठी स्त्री शक्ती भाजी मंडईची स्थापना भाऊंनी केली. शहरात जातीय सलोखा राहावा यासाठी ज्याप्रमाणे जोशी वाडा येथे भव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधले त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्यासाठी सुसज्ज अशी मज्जिद सुद्धा बांधण्याकामी किशोर भाऊंनी पुढाकार घेतला. राजकारणात राहूनही कधीही राजकारण न करणारा स्वच्छ विचारांचा माणूस म्हणून किशोर भाऊंची सर्वपक्षीय जेष्ठ नेत्यांशी सुलोख्याचे संबंध राहिले आहेत. राजकारणात वैयक्तिक राजकीय महत्त्वकांक्षा नसताना जनसेवाला प्रथम प्राधान्य किशोर भाऊंनी नेहमीच दिले आहे. गोरगरीब सच्चे कार्यकर्ते राजकीय प्रवाहात सक्रिय होऊन राजकीय घराणे शाही संपुष्टात यावी अशी भाऊंची मनोमन इच्छा असते.

आपल्या शहरावर प्रेम असणाऱ्या व शहरातील नागरिकांविषयी आस्था असणाऱ्या किशोर भाऊंची शहराविषयीची तळमळ त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. राखी अर्थात हा नक्कीच साधासुधा धागा नाही, यामागे असणारी भावना अत्यंत वेगळी आहे. भावाने बहिणीला दिलेले संरक्षणाचे वचन हे खूपच महत्त्वाचे आहे. जनसेवा विकास समिती ही नेहमीच समाजाच्या पाठीचा कणा म्हणून यथाशक्तीनुसार अविरतपणे कार्यरत असल्याचे आपणा सर्वांना ज्ञात (Kishore Aware) आहे.

कोणत्याही धाडसी शूरवीर अशा पुरुषांनी आपल्या आसपासच्या सर्व महिलांचे दुर्बलांचे, अनाथांचे व आबाल वृद्धांचे, अपंगांचे रक्षण करणे हा राजधर्म जनसेवा विकास समिती आवरितपणे जोपासत आहे व भविष्यातही जोपासत राहील.

 – ऍड. निवृत्ती फलके
मावळ तालुका अध्यक्ष 
वारकरी साहित्य परिषद 
9623635513.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.