Kivale News : … अन शर्यतीचे घाट गाजविणारा ‘बुलेट’ आयुष्याची शर्यत ‘हरला’

कुटुंबातील सदस्याप्रमाणे केले अंत्यसंस्कार व दशक्रिया विधी; बैलगाडा प्रेमींवर शोककळा

एमपीसीन्यूज ( गोविंद बर्गे ) : बैलगाडा शर्यतीचे घाट गाजवून आपल्या जबरदस्त वेगाने एकेकाळी संपूर्ण पुणे आणि रायगड जिल्ह्यातील बैलगाडा शौकिनांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘बुलेट’ची अकाली ‘एक्झिट’ सर्वानांच्या मनाला चटका लावून गेली. पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळ केलेल्या बुलेटच्या निधनानंतर त्याच्या अत्यंदर्शनाला शेकडो बैलगाडा प्रेमींनी हजेरी लावली. शर्यतीच्या या राजाचा शुक्रवारी विधिवत दशक्रिया विधीही पार पडला. त्याने गाजविलेल्या शर्यतींच्या आठवणी जागवत उपस्थित बैलगाडा प्रेमींनी त्याला अखेरचा सलाम केला.

पिंपरी चिंचवड शहरातील किवळे गावचे शेतकरी नानासाहेब तरस यांच्यासह पंचक्रोशीतील बैलगाडाप्रेमी व शेतकऱ्यांचा अतिशय लाडका बैल बुलेट याचे  नुकतेच निधन झाले.

बैलगाडा शर्यतीमधील त्याचा वेग प्रचंड होता. त्यामुळे त्याने असंख्य शर्यती एकहाती जिंकल्या. तसेच बैलगाडा शर्यतीमधील त्याचा वेग पाहण्यासाठी राज्यभरातील बैलगाडा प्रेमींची उपस्थिती असायची.

अशा शयर्तीत बाजी मारून त्याने विजयाचे अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले. मात्र, बैलगाडा शर्यतीच्या या बादशहाने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी अचानक जगाचा निरोप घेतला.

त्याच्या आठवणीविषयी त्याचे मालक नव्हे पालक असलेले शेतकरी नानासाहेब तरस म्हणाले, पाच वर्षांचा असताना त्याला आम्ही आमच्याकडे आणले. त्याची देहयष्टी आणि रुबाब हा प्रत्येकाचे डोळे दीपावेत असाच होता.

दररोज उडीद डाळ, मका भरडा, कडबा, उसाची कुट्टी, दूध, अंडी अशा मर्दानी आहारात वाढवलेल्या बुलेटने मला अनेक बैलगाडा शर्यती जिंकून दिल्या. त्याने केलेल्या विक्रमामुळे आज पुणे जिल्हा नव्हे, तर राज्यात माझी ओळख निर्माण झाली. दरवर्षी बैलपोळा आणि त्याचा वाढदिवस त्याला साजेशा जल्लोषात साजरा केला जायचा.

बैलपोळ्याला डीजे, हलगी, आकर्षक सजावट, त्याच्या शेकडो चाहत्यांना नवे कपडे, जेवणावळी, तर वाढदिवसालाही असाच थाट असायचा, असे सांगताना नानासाहेबांसह उपस्थित त्याच्या चाहत्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यापासून बुलेटचा नियमीत धावण्याचा सराव बंद झाला. त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर झाला. त्यातच अचानक 3 डिसेंबरला त्याला फिट सदृश्य झटका आला आणि काही कळायच्या आतच त्याने जगाचा निरोप घेतल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्या काळजाचा तुकडा सोडून गेल्याचे दुःख शब्दात व्यक्त करणे अवघड. म्हणूनच त्याचा अंत्यविधी आणि दशक्रिया विधी कुटुंबातील सदस्याप्रमाणे केला. तो मला पोरका करुन गेला ही कल्पनाही सहन होत असल्याचे नानासाहेबांनी सांगितले.

ज्या प्राणीप्रेमी संघटनेमुळे बैलगाडा शर्यतीवर बंदी आली. त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांच्या गोठ्यांना भेट द्यावी. मग आम्ही शर्यतीच्या बैलांचा छळ करतो की तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांचा सांभाळ करतो हे त्यांना पाहायला मिळेल. वस्तुस्थिती पाहून तरी त्यांचे डोळे उघडावेत, ही तमाम बैलगाडा मालकांची अपेक्षा आहे. बैलगाडा शर्यत बंदीमुळे सद्यस्थितीत अनेक बैलांचा नियमित सराव बंद आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यातूनच आमच्या बुलेटचा मृत्यू झाला. बंदी उठेपर्यंत नियमित सरावाला तरी परवानगी मिळावी ही माफक अपेक्षा. – नानासाहेब तरस, बैलगाडा मालक, किवळे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.