Kivale News : दांगट वस्ती ते पेंडसे कॉलनी येथील नाल्याचा कामाला प्रारंभ

राजेंद्र तरस यांचा प्रयत्नांना यश; प्रत्यक्ष कामाला आजपासून सुरुवात

एमपीसीन्यूज : किवळे-विकासनगर येथील दांगट वस्ती ते पेंडसे कॉलनी दरम्यान महापालिका प्रशासनाच्या वतीने नाला बांधण्याच्या कामाला आजपासून ( मंगळवार) प्रारंभ झाला. त्यामुळे या भागात आता पावसाळ्याच्या दिवसांत या नाल्यालगतच्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरण्याची समस्या कायमची सुटणार आहे.

आज सकाळी या नाला बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, शिवसेनेचे राजेंद्र तरस, सुरेश नायर, शमशुद्दीन शेख यांच्यासह परिसरातील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी व नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

किवळे-विकासनगर येथील दांगट वस्ती ते पेंडसे कॉलनी दरम्यान कच्चा नाला आहे. या नाल्यात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सांडपाणी सोडण्यात येते. या नाल्यालगतच दांगट वस्तीसह, गुलमोहर अपार्टमेंट, विब्स पब्लिक स्कूल, बालाजी स्क्वेअर व ओम पॅराडाईज सोसायटी आहे.

दरवर्षी पावसाळ्यात नाल्यातील सांडपाणी या सोसायट्यांमध्ये घुसायचे. त्यामुळे नागरिकांना कायम त्रास सहन करावा लागत होता.

_MPC_DIR_MPU_II

त्यातच या वर्षी झालेल्या चक्रीवादळ व मुसळधार पावसात नाल्यातील पाणी मोठयाप्रमाणात स्थानिक नागरिकांच्या घरात शिरले. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

त्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र तरस यांनी मध्यरात्री घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या मदतीने पाण्याला वाट मोकळी करुन दिली होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी नाल्याची समस्या दूर करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर राजेंद्र तरस यांनी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्यासह महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार या नाल्याच्या बांधकामाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. याकामी दांगट कुटुंबियांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

दांगट वसंत ते पेंडसे कॉलनी दरम्यान कच्चा नाला असल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत होते. यंदा चक्रीवादळात झालेल्या मुसळधार पावसाने येथे मोठी दैना उडाली होती. नाल्याचे पक्के बांधकाम करण्याची मागणी स्थानिकांनी माझ्याकडे केली. त्यानुसार नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच या कामी दांगट कुटुंबीयांनी मोलाची मदत केली. त्यामुळेच या नाल्याच्या कामाला सुरुवात झाली. दांगट कुटुंबीय आणि नगरसेवक ओव्हाळ यांच्यामुळे ही समस्या सुटली. राजेंद्र तरस – शिवसेना कार्यकर्ते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.