Kivale News : नव वर्षाच्या स्वागताला दूध वाटप करुन व्यसनमुक्तीचा संदेश

श्री राजेंद्र सोशल फाउंडेशनचा तरुणाईला संदेश

एमपीसीन्यूज : सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना पूर्वसंध्येला अनेक तरुण तरुणी मद्यधुंद अवस्थेत डिजेच्या तालावर थिरकताना दरवर्षी पाहायला मिळतात. तरुणाईने व्यसनापासून दूर राहत नव्या वर्षाचे स्वागत चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून करावेत, यासाठी विकासनगर किवळे येथील श्री राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्यावतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत आज, गुरुवारी सकाळी तरुणांना दूध वाटप करुन व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.

विकासनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये तरुणांसह आबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगविले पाहिजे, यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र तरस यांनी स्वत: रस्त्यावर येऊन तरुणाईला दुधाचे वाटप केले.

नववर्षाचे स्वागत दारु पिऊन नव्हे तर दूध पिऊन करू या, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. विकासनगर रिक्षा स्टँडचे सर्व पदाधिकारी, जेष्ठ नागरिक आणि दत्तनगर महिला भजनी मंडळाच्या महिला सदस्या आवर्जून उपस्थित होत्या. जवळपास 218 ग्लास दुधाचे वाटप करण्यात आले. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी दूध पिऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

या उपक्रमाचे मुख्य आयोजक राजेंद्र तरस यांच्यासह रवींद्र कदम, देहूरोड ‘रिपाइं’चे माजी शहराध्यक्ष दिलीप कडलक, उद्योजक संदीप कडलक, मनसेचे राजू येवते, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे हभप हिरामणमहाराज येवले, चंद्रकांत वाघमारे, संदीप कुडले, संजय बंसल, रोहित सरनोबत, अन्वर तांबोळी, धीरज बाबर, निलेश बळगर, तानाजी ढवळे, अंकुश तरस, चुंनीलाल अगरवाल, संगिता तरस, सुनीता चंदने पाटील, स्मीता तरस, सीमा नायर, मंगल माने, सविता वाघमोडे, नीता जाधव, सिंधू निंचळ, शुभांगी मात्रे, अरूणा शिंदे, सुनीता पौडवाल आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.