Kiwale News : तीन सुलभ हफ्त्यांत वीज बिल भरण्याची सवलत; शिवसेना आंदोलनावर ठाम

महावितरणच्या निगडी- प्राधिकरण येथील कार्यकारी अभियंत्यांनी तरस यांना लेखी पत्र पाठवून वीज बिल भरणा करण्यासंदर्भात देण्यात आलेल्या सवलतीची माहिती दिली आहे.

एमपीसीन्यूज : पूर्ण वीज बिल भरण्यास असमर्थ असणाऱ्या ग्राहकांना तीन सुलभ हफ्त्यांत बिल भरण्याची सवलत तसेच एकरकमी बिल भरल्यास दोन टक्के सूट दिली जाईल, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. मात्र, अशी सवलत देण्यापेक्षा वीज बिलात कपात करण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. तसेच आमच्या मागणीच्या पूर्ततेसाठी लवकरच आंदोलन करणार असल्याची माहिती विकासनगर – किवळे येथील युवा शिवसैनिक राजेंद्र तरस यांनी दिली.

यासंदर्भात महावितरणच्या निगडी- प्राधिकरण उपविभाग कार्यायाकडून तरस यांना लेखी पत्र पाठविण्यात आले आहे. कोरोनाच्या संकट काळात महावितरणकडून ग्राहकांना भरमसाठ रकमेची वीजबिले पाठविण्यात आली आहेत. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांचे जगणे असह्य झाल्याने त्यांना  या भरमसाठ रकमेच्या वीज बिलांचा भरणा करणे अशक्य आहे.

त्यामुळे पुढील शासन आदेश येईपर्यंत वीज बिल भरण्याची सक्ती करू नये तसेच मानवतेच्या दृष्टीकोनातून वीज बिलांच्या रकमेत कपात करावी, अशी मागणी श्री राजेंद्र बाळासाहेब तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने युवा शिवसैनिक राजेंद्र तरस यांनी केली होती.

तसेच महावितरणने किवळे, विकासनगर परिसरात वीज बिले भरण्याची सक्ती करु नये ; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा तरस यांनी महावितरणला दिला होता.

त्यावर महावितरणच्या निगडी- प्राधिकरण येथील कार्यकारी अभियंत्यांनी तरस यांना लेखी पत्र पाठवून वीज बिल भरणा करण्यासंदर्भात देण्यात आलेल्या सवलतीची माहिती दिली आहे.

महावितरणच्या 3 जुलै 2020 च्या परिपत्रकानुसार ज्या ग्राहकास पूर्ण वीज बिल भरणे शक्य नाही त्यांना तीन सुलभ हफ्त्यांत बिल भरण्याची सवलत देण्यात आली आहे. तसेच एकरकमी बिल भरल्यास दोन टक्के सूट दिली जाईल, असे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.

दरम्यान, एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना संसर्गामुळे टाळेबंदी असल्याने मीटर रीडिंग घेण्यात आले नव्हते. त्यामुळे ग्राहकांना सरासरी वीज बिल पाठविण्यात आले.

त्यानंतर महावितरणच्या 30  मे 2020 च्या परिपत्रकानुसार जूनमध्ये ज्या भागात टाळेबंदी शिथिल करण्यात आलेल्या भागातील मीटर रीडिंग घेण्यात आले. त्यामुळे रिडींगनुसार तयार केलेली बिले अचूक असल्याचे महावितरणकडून तरस यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

दरम्यान, महावितरणकडून वीज बिलात कपात करण्याच्या मागणीचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे वीज बिल वसुली करण्यासाठी त्यांनी सुलभ हफ्त्यांची सवलत दिली आहे. तसेच एकरकमी बिल भरणा केल्यास दोन टक्के सवलत दिली आहे. मात्र, आम्ही वीज बिलाच्या रकमेत कपात करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. लवकरच या मागणीसाठी शिवसेनेतील वरिष्ठांसोबत चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असे युवा शिवसैनिक राजेंद्र तरस यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.