Kiwale news: सरकार स्थिर,फडणवीस यांनी चार वर्षे स्वप्न बघत रहावे – सुभाष देसाई

एमपीसी न्यूज – आमचे महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार स्थीर झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा वाढता विश्वास आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चार वर्षे सत्तेचे स्वप्न बघत रहावे लागेल, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लगाविला.

किवळे येथे देसाई यांनी आज (शनिवारी) माध्यमांशी संवाद साधला. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या पदासाठी पुन्हा एकदा निवडणूक होणार आहे. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन लोटसचे संकेत दिले आहेत. आम्ही फासे पलटवणार, शिडीशिवाय आम्ही फासे पलटवू आणि हे फासे खूप मोठे असतील, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, ते स्वप्न बघत आहेत. त्यांना चार वर्षे स्वप्न बघत रहावे लागेल. सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे असे अंदाज व्यक्त करण्याखेरीज आता तरी त्यांच्या हातात काही नाही.

आमचे महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार स्थीर झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेने वाढता विश्वास दाखविला आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांची आपली मुदत पूर्ण करेल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे कोणतीही नाराजी नाही. परंतु, पटोले विधानसभा अध्यक्ष म्हणून अधिक काळ लाभले असते तर बरे झाले असते. ते आम्हाला हवे होते. परंतु, त्यांचा पक्षांतर्गत विचार असल्यामुळे दुसऱ्या पदावर जाण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला.  नाना पटोले यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. कुठल्याही पदावर गेले तरी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असेही देसाई म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.