Kiwale News : सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी येथील जॉब फेअरचे मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उद्घाटन 

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई महामार्गाच्या जवळ असलेल्या सिम्बायोसिस स्किल ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यापीठ परिसरात जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते आज (शनिवारी, दि. 04) उद्घाटन झाले. 

कोरोना काळात सिम्बायोसिसच्या विद्यार्थ्यांनी शंभर रोजगार प्राप्त केल्याचे ऐकून त्यांना आनंद झाल्याचे सांगत नवाब मलिक म्हणाले, ‘सिम्बायोसिसने अद्वितीय व आदर्श कौशल्य विद्यापीठाची निर्मिती केली आहे. या विद्यापीठाचा आदर्श इतर राज्यांनी देखील घ्यावा’.

विद्यापीठाच्या प्रधान कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या ‘कौशल्य आधारित शिक्षण ऑनलाईनपेक्षा प्रात्यक्षिक पद्धतीने अधिक प्रभावीरीत्या होते. विद्यापीठातील प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी विद्यार्थीही खूप उत्सुक आहेत. प्रात्यक्षिक करत शिक्षण हा आमच्या विद्यापीठाचा मूलमंत्र आहे. कोरोना काळात देखील आम्ही सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.’

विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अश्विनी कुमार शर्मा विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले ‘विद्यापीठ प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्यास पूर्णपणे तयार आहे आणि विद्यार्थांच्या सुरक्षेसाठी दैनंदिन सॅनिटाईझ करण्यात येईल.’

विद्यापीठाने पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या सहयोगाने सुरू केलेल्या अल्पकालीन कौशल्य आधारित विद्यापीठ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणत जॉब फेअरचे आयोजन केले होते. हा जे. पी. मॉर्गन यांचा सीएसआर प्रकल्प आहे. इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी देखील या जॉब फेअरमध्ये सहभागासाठी परवानगी देण्यात आली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.