Kiwale News : सिंबायोसिसमध्ये ट्रान्सजेंडर्ससाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम

एमपीसी न्यूज – सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि ग्रॅव्हिट्स फाउंडेशन यांनी ट्रान्सजेंडर समुदायाला कौशल्यावर आधारित कार्यक्रम (स्किल बेस प्रोग्रॅम) देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. ट्रान्सजेंडर समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. 

ट्रान्सजेंडर समुदायास यशस्वी उद्योजक बनविण्यासाठी कौशल्याभिमुख अभ्यासक्रम देण्याचा भारतातीत हा प्रथम उपक्रम असेल. या प्रकल्पात शिवणकाम, सॅनिटरी पॅड बनविणे, ब्युटी सर्व्हिसेस, हर्बल प्रॉडक्ट्स आदी प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

या वेळी बोलताना प्रो-चान्सलर डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, ‘सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने सर्वसमावेशक शिक्षणाच्या गरजेवर भर दिला आहे. भारतात प्रथमच एक स्किल युनिव्हर्सिटी ट्रान्सजेंडर समुदायासाठी विशेष डिझाइन केलेले प्रोग्रॅम घेऊन आली आहे.

विद्यार्थ्यांनी तयार केलेली उत्पादने खरेदी करण्यासाठी उद्योगांचे सहकार्य घेऊन उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक अद्वितीय मॉडेल तयार केले आहे. समाजासाठी काहीतरी करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे.’

ग्रॅव्हिटस कॉर्पोरेशनच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक उषा काकडे म्हणाल्या, ‘प्रत्येक व्यक्तीला सन्माननीय जीवन जगण्याचा अधिकार आहे, यावर आमचा ठाम विश्वास आहे. आमचा प्रयत्न आहे की, आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकू आणि त्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यात मदत करू. यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे आणि विद्यार्थ्यांद्वारे उत्पादीत उत्पादने खरेदी करण्यासाठी रुग्णालयांशी करार केला आहे.

हे उपक्रम त्यांना पहिल्या दिवसापासून कार्य सुरू करण्यास, आत्मनिर्भर होण्यास आणि सन्माननीय जीवन जगण्यासाठी मदत करतील. आम्ही लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी एकत्र येऊन ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मदत केली. त्यांनी समाजासाठी खूप काम केले आहे.’

लक्ष्मी नारायण त्रिपाठी म्हणाल्या, ‘असा विचारशील उपक्रम सुरू केल्याबद्दल मी सिंबायोसिस आणि ग्रॅव्हिटस फाउंडेशनची आभारी आहे. हे माझे कर्तव्य आहे की, मी काहीतरी चांगले कार्य करण्यात मदत करू शकते जे आपल्या लोकांना मदत करेल. मी या प्रकल्पाच्या भव्य यशासाठी शुभेच्छा देतो. वंचित गटांना सन्माननीय उपजीविका निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरेल.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.