Kiwale News : राजकारण करुन फ्लेक्स काय काढता, जनतेच्या हृदयातून काढून दाखवा – राजेंद्र तरस

एमपीसीन्यूज : दिवसरात्र जनतेची सेवा करीत असताना पायाखालची वाळू सरकलेल्या राजकीय व्यक्तीने माझा मोफत आरोग्य शिबिराची जनतेला माहिती व्हावी या उद्देशाने लावलेला फ्लेक्स महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काढण्यास भाग पाडले. या निमित्ताने राजकारणाची गलिच्छ बाजू पाहायला मिळाली. मात्र, अमावस्या आणि पौर्णिमेला तुरळक दर्शन देणाऱ्यांनी फ्लेस्क काय काढता, मला जनतेच्या हृदयातून काढून दाखवावे, असे खुले आव्हान शिवसेनेचे युवा नेते राजेंद्र तरस यांनी दिले आहे.

किवळे, विकासनगर येथील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते राजेंद्र तरस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. उद्या, रविवारी तरस यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांनी हे शिबीर आयोजित केले आहे. या शिबिराची परिसरातील गोरगरीब जनतेला माहिती व्हावी या उद्देशाने त्यांनी विकासनगर भागात फ्लेक्स लावले आहेत.

मात्र, गुरुवारी महापालिका अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी घेतली नसल्याचे व आचारसंहिता असल्याचे सांगत कारवाई करीत संबंधित फ्लेक्स काढून टाकले. ही कारवाई   केवळ राजकीय आकसापोटी माझ्याच फ्लेक्सवर करण्यात आली. या मागे एका राजकीय व्यक्तीचा हात असल्याचा आरोप राजेंद्र तरस यांनी केला आहे.

कारवाई करायचीच होती तर ती सरसकट सर्वच विना परवानगी लावलेल्या फ्लेक्सवर करायची होती. केवळ माझ्याच  तेही समाजोपयोगी कार्यासंबंधी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर करण्यात आली. प्रभागातील इतर अनेक विना परवानगी लावण्यात आलेल्या फ्लेक्सकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले. यावरून माझ्या नि:स्वार्थी सामाजिक करण्याचा धसका घेतलेल्या एका राजकीय व्यक्तीनेच कट कारस्थान करुन हे गलिच्छ राजकरण केले आहे.

सामाजिक कार्याच्या आड येणाऱ्या अशा कपटी राजकारणाचा निषेध करावा तेवढा तो कमी आहे. माझ्यावर चांगले संस्कार असल्याने मी कधी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करु शकत नाही. मी प्रामाणिकपणे कोणतेही पद नसताना जनतेशी बांधिलकी जपून सामाजिक कार्य करीत आहे.

माझे फ्लेक्स काढणाऱ्यांनी मला जनतेच्या हृदयातून काढून दाखवावे, असे आव्हान तरस यांनी यांनी दिले आहे. गलिच्छ राजकारण करुन आपली जुनी ओळख पुन्हा एकदा करुन देणाऱ्यांना धन्यवाद, असा टोलाही तरस यांनी लगावला आहे.

महापालिका निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्चस्व आणि परस्पर द्वेषभावनेतून अनेक ठिकाणी कुरघोड्यांचे राजकारण सुरु झाले आहे. त्यातूनच अनेक प्रभागांमध्ये आता राजकारण तापू लागले आहे. आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. किवळे विकासनगर येथील फ्लेक्स काढण्याच्या प्रकरणातून हेच दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.