Symbiosis News: महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यासाठी सिंबायोसिसने पुढाकार घ्यावा – सुभाष देसाई

सिंबायोसिसचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज – उद्योग खात्याने नवी मुंबईत अमेरिकेतील एका विद्यापीठाच्या सहकार्याने स्किल डेव्हलपमेंट सेंटर स्थापन केले आहे. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी त्याच्या तोडीस तोड असून तरुणांना रोजगार आणि कौशल्य देण्यासाठी पुढे यावे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यासाठी सिंबायोसिसने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा (सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठ) पहिला दीक्षांत समारंभ आज (शनिवार) विद्यापीठाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. देसाई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

फियाट इंडियाचे अध्यक्ष रवी गोगिया यांची प्रमुख उपस्थिती होती. सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. आश्विनी कुमार शर्मा उपस्थित होते. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठातील 2020 या पहिल्या बॅचचा हा दीक्षांत समारंभ असल्याने त्याला विशेष महत्त्व होते.

सुभाष देसाई म्हणाले की, कौशल्य आधारित शिक्षणात सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी देशासाठी एक आदर्श आहे. कौशल्य विकासासाठी सिंबायोसिस विद्यापीठाची प्रतिबद्धता आणि या ठिकाणी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा कौतुकास्पद आहेत. पूर्वी फक्त पदवीला महत्व होते. आता कौशल्यावर आधारित शिक्षणाला महत्व आहे. कौशल्यावर आधारित शिक्षण घेतलेल्यांची उद्योग क्षेत्राला गरज आहे.

पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षण घेतलेल्यांची उद्योग क्षेत्राला सर्वाअर्थाने गरज आहे. सिंबायोसिसने काळाची गरज ओळखली आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्राने एकत्रित येण्याचे सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने यशस्वी उदाहरण दाखवून दिले आहे.

सिंबायोसिस युनिव्हर्सिटीने शिक्षण आणि उद्योगांशी सांगड घातली आहे. विद्यार्थ्यांनी नावीन्याचा शोध घ्यावा. त्यामुळे भविष्य उज्वल होईल. महाविकास आघाडी सरकार कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सक्षम आहे, असेही त्यांनी सांगितले.

कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, आता 80 टक्के विद्यार्थी पारंपरिक शिक्षण घेत आहेत. तर, केवळ 20 टक्के विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेत घेतात. दरवर्षी लाखो अभियंते तयार होतात. त्यातील किती लोकांना रोजगार मिळतो? शिक्षणावर सरकार करोडो रुपये खर्च करत आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळाले पाहिजे. तरुण हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांना शिक्षण आणि रोजगार मिळाला पाहिजे. या पद्धतीचे विद्यापीठ, सरकारने शिक्षण दिले पाहिजे. तरुणांमधून उद्योजक घडवावे, असेही ते म्हणाले.

दीक्षांत समारंभानंतर विद्यापीठाने सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय उद्योग संमेलनाचे आयोजन केले होते. फियाट इंडिया, सीमेंस, आयसीआयसीआय, एनरिक, डाईकिन आणि इतर अनेक उद्योग भागीदारांनी या बैठकीला भाग घेतला.

यावेळी सिंबायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने ऑटो क्लस्टर, एझराइड इलेक्ट्रिक व्हेइकल्स, एसएएस ऑटोमेशन, ब्युटी वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल आणि जीडी एनव्हायर्नमेंटल यासह अनेक संस्थांशी सामंजस्य करार केले. या करारांमुळे संयुक्त कौशल्य प्रशिक्षण उपक्रम आणि विविध क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन मिळणार आहे.

 

फियाटचे अध्यक्ष रवी गोगिया यांनीही सिंबायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि फियाट यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येत असललेल्या उत्पादन गुणवत्ता पदविका अभ्यासक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. य अभ्यासक्रमाद्वारे ग्रामीण भागातील गरजू मुलींमध्ये जागतिक दर्जाच्या कार्यपद्धतींचे कौशल्य विकसित करण्यात येते. कौशल्य विकासासाठी असलेल्या प्रतिबद्धतेचा गोगिया यांनी पुनरुच्चार केला आणि यापुढेही सहकार्याची ग्वाही दिली.

या समारंभात बीबीए रिटेल मॅनेजमेंट, बीबीए लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, बीबीए पोर्ट्स आणि टर्मिनल मॅनेजमेंट, बीएससीचे विद्यार्थी ब्यूटी अँड वेलनेस, डायटेटिक्स इन पीजी डिप्लोमा आणि डेटा सायन्स आणि एआय मधील पदव्युत्तर पदविका प्राप्त केलेल्या स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आले. प्रत्येक अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचे मानले जाणारे कुलपतींचे सुवर्णपदक देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.