Kiwale : निसर्ग सेवा करताना भावनिकतेला अभ्यासाचीही जोड द्यावी – अनिल पाटील

एमपीसी न्यूज- निसर्ग सेवा करताना भावनिकतेला अभ्यासाचीही जोड दिली पाहिजे. जेणेकरून समस्येच्या मुळावर काम करता येईल. निसर्ग संवर्धन केवळ एक इव्हेंट न होता त्याची मूव्हमेंट झाली पाहिजे, असे मत जलतज्ज्ञ अनिल पाटील यांनी व्यक्त केले.

 

पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या निसर्गराजा मित्र जीवांचे या संस्थेचा अकरावा वर्धापन दिन व मित्र जीवांचे पुरस्कार प्रदान सोहळा संस्थेच्या किवळे येथील लीला नर्सरी मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सहज जल बोध कार, भूजलतज्ज्ञ उपेंद्र धोंडे होते.

 

वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने दर वर्षी पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तीस मित्र जीवांचे हा पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार आंबा घाट येथे निसर्ग सेवा करणाऱ्या प्रमोद माळी यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

 

उपेंद्र धोंडे लिखित निसर्ग बेट या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कोणत्याही क्षेत्रातील कार्यकर्ता किंवा स्वयंसेवक याने समाज आणि आपले कुटुंब यांना समान प्राथमिकता दिली पाहिजे. कौटुंबिक जबादाऱ्या सांभाळताना आपल्या सामाजिक जबाबदारीकडे दुर्लक्ष करता कामा नये तसेच सामाजिक कार्य करताना देखील कुटुंबाकडे दुर्लक्ष करायला नको. कोणतीही काम तांत्रिदृष्ट्या योग्य असणे गरजेचे आहे आणि ते तसे असल्याने त्याची परिणामकारता निश्चित वाढते याच बरोबर जल संवर्धन आणि वृक्ष संवर्धन हे एकमेकास पूरक असे उपक्रम आहेत. यात देवराई, पंचवटी या सारख्या पारंपारिक उपायासोबत निसर्ग बेट ही संकल्पना धोंडे यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतात मांडली.

 

वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, या वर्षी शून्य कचरा व्यवस्थापन या विषयावर राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे, नाशिक, अहमद नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

 

संस्थेचे अध्यक्ष तुषार जाधव यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा तसेच नियोजित उपक्रमांची माहिती दिली.
परशुराम शिंगे यांनी सूत्रसंचालन केले तर राहुल घोलप यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन निसर्गराजा च्या स्वयंसेवकांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.