KKR vs MI : केकेआरचा मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : पॅट कमिन्सच्या अविश्वसनिय आणि धुवांधार फलंदाजीमुळे केकेआर संघाने बलाढ्य मुंबई इंडियन्सला पाच गडी आणि 24 चेंडू राखत पराभूत करून आपला लागोपाठ तिसरा विजय प्राप्त केला.

यावर्षीच्या आयपीएल मध्ये कोण कप मिळवेल हे येत्या काही दिवसांत कळेलच,पण सध्या तरी आयपीएलच्या चाहत्यांना एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे मुंबई इंडियन्सला झाले तरी काय आहे हाच.मजबूत मानली जात असलेली फलंदाजी ना त्या किर्तीला जागत आहे तो खतरनाक गोलंदाजी आपला दर्जा सिद्ध करत आहे,त्यामुळेच सर्वधिक  पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईइंडियन्सचा यावर्षीच्या स्पर्धेतला आजचा लागोपाठ तिसरा पराभव झाला,तो ही अतिशय लाजिरवाणा.

केकेआरने मिळवलेल्या आजच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला यावर्षीच्या स्पर्धेतला आपला पहिलाच सामना खेळणारा  पॅट कमिन्स. ज्याने फलंदाजी करताना शब्दशः केला कहर ,त्याने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजावर हल्ला बोल करताना फक्त 14 चेंडूत केले या मोसमातले सर्वात वेगवान अर्धंशतक, अर्थात आयपीएलच्या  इतिहासात  तो संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर विराजमान झाला आहे. अशी कामगिरी के एल राहुलने 2018 साली दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध केली होती. या धुवांधार फलंदाजीमुळे केकेआर संघाने आपला लागोपाठ तिसरा विजय मिळवून या स्पर्धेत आपला डंका दणदणीतरित्या वाजवला आहे.

कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने आज नानेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागताच मुंबई इंडियन्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले,मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात रोहीत आणि ईशान किशनने केली,पण रोहितची खराब कामगिरी आजही कामगिरी चालूच राहिली. तो बारा चेंडू खेळूनही फक्त 3 च धावा करू शकला. त्याच दडपणात त्याने आक्रमक होण्याचा केलेला प्रयत्न फसला आणि तो उमेश यादवचा आजचा पहिला बळी ठरला.

यानंतर फॉर्मात असलेल्या ईशान किशन आणि डीवाल्ड ब्रेविसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला,पण ब्रेविस 29 धावा करून वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला,त्यानंतर थोड्याच वेळात या स्पर्धेत चांगल्याच फॉर्मात असलेला ईशान किशन पण पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर 14 धावा काढून बाद झाल्यावर मुंबई संघ चांगलाच अडचणीत आला. यावेळी त्यांची अवस्था 3 बाद 55 अशी झाली होती. यावेळी संघाच्या अडचणीत धावून आला तो आपल्या पहिल्याच सामन्यात खेळणारा सूर्यकुमार यादव.  दुखापतीमुळे आतापर्यंत बाहेर बसावे लागलेल्या यादवला आज संघात स्थान मिळाले. मात्र त्याला पहिल्याच सामन्यात संघाला अशा कठीण परिस्थितीत असताना खेळायला यावे लागले.

मोठे फलंदाज मोठे तेंव्हाच होतात, वा मानले जातात, जेंव्हा परिस्थिती प्रतिकूल असताना ते तिच्यावर मात करून आपला दमखम दाखवतात. तेच काम आज पुन्हां एकदा सूर्यकुमारने केले. त्याला साथ मिळाली ती नवोदित पण अगदी काहीच सामन्यात आपल्या चांगल्या कामगिरीने सर्वाना प्रभावित करणाऱ्या तिलक  वर्माची. या दोघांनी 83 धावांची आक्रमक भागीदारी करून डावाला बऱ्यापैकी स्थैर्य देण्यात मोलाची कामगिरी बजावली. सूर्यकुमारने आपले आयपीएल मधले 14 वे अर्धशतक पूर्ण करताना केवळ 36 चेंडूत 52 धावा केल्या, तर त्याला तिलक वर्माने तितकीच तोलामोलाची साथ देताना 28 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या षटकात सूर्यकुमार 52 धावांवर असताना कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला.

त्यानंतर आलेल्या पोलार्डने उरलेल्या 5 चेंडूत 3 षटकार मारत नाबाद 22 धावा चोपल्या आणि संघाला 161 धावांची चांगली मजल मारून दिली. कोलकाता संघाकडून आज पहिल्यांदाच खेळणारा कमिन्स सर्वाधिक 2 बळी घेण्यात यशस्वी ठरला तर वरुण चक्रवर्ती आणि उमेशने एकेक बळी मिळवला.

आधीच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून आपला आत्मविश्वास जोरदार असलेल्या कोलकाता संघाने आपल्या तिसऱ्या विजयासाठी कराव्या लागणाऱ्या 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यरला सलामीला पाठवले,अजिंक्य रहाणे आज काही खास कामगिरी करू शकला नाही आणि केवळ 7 धावा काढून टायमल मिल्सच्या गोलंदाजीवर सॅम्सच्या हातात झेल देऊन बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार श्रेयसलाही आज काही खास कामगिरी करता आली नाही. तो सुद्धा आज अगदीच स्वस्तात बाद झाला. त्याने फक्त 10 धावा काढल्या तो सॅम्सला आपली विकेट देऊन तंबूत परतला.

त्यानंतर थोड्या फार धावांची भर घालून बिल्लिंग ,नितीश राणा आणि आंद्रे रसेल पण स्वस्तात बाद झाले आणि केकेआरची अवस्था 14 व्या षटकाच्या सुरुवातीलाच 5 बाद 101 अशी झाली, यावेळी मुंबई संघ आपला पहिला विजय मिळवेल अशी शक्यता निर्माण झालेली असताना फलंदाजीसाठी आला तो पॅट कमिन्स, त्याने आल्या आल्या जो हल्लाबोल सुरु केला,त्यात मुंबई इंडियन्सचे गोलंदाज पुरते भांबावून गेले. ते सावरण्याआधीच पॅट कमिन्सने या स्पर्धेतले सर्वधिक वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी करताना केवळ 14 चेंडूत चार चौकार आणि सहा षटकार मारत नाबाद 52 धावा चोपल्या आणि मुंबई इंडियन्स संघाला तब्बल 24 चेंडु आणि 5 गडी राखुन पराभूत करण्यात मोठाच वाटा उचलला.

त्याने डावाच्या 16 व्या षटकात 35 धावा चोपताना  डॅनियल सॅम्सच्या अक्षरशः हजारो व्हॉल्ट्सच्या प्रखर उजेडात काजवे चमकवले.हे आयपीएलच्या इतिहासातले तिसरे महागडे षटक ठरले.कमिन्सचे हे वैयक्तिक तिसरे अर्धशतक ठरले, त्याच्या या कामगिरीमुळे वेंकटेश अय्यरचे अर्धशतक झाकोळून गेले,पण अय्यरने सुद्धा संघ अडचणीत असताना जबाबदारीने खेळत 41 चेंडूत नाबाद 50 धावा करून संघाला विजयाच्या जवळ आणले.हे त्याचे आयपीएल मधले 5 वे अर्धशतक आहे.

मुंबई इंडियन्स संघाचा हा लागोपाठ तिसरा पराभव तर कोलकता संघाचा हा तिसरा विजय ठरला, पॅट कमिन्सला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स

4 बाद 161

यादव 52,पोलार्ड नाबाद 22,वर्मा नाबाद 38

कमिन्स 49/2,उमेश 25/1

पराभूत विरुद्ध

कोलकाता नाईट रायडर्स

16 षटकात 5 बाद 162

कमिन्स नाबाद 56, व्हीअय्यर नाबाद 50,बिल्लिंग 17

एम अश्विन 25/2,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.