Chinchwad : पोलीस कर्मचा-यांच्या अडचणी जाणून घ्या; पोलीस आयुक्तांच्या वरिष्ठ निरीक्षकांना सूचना

एमपीसी न्यूज – कामाचा ताण, घरगुती वाद, कौटुंबिक अडचणी, आर्थिक अडचणी आणि अन्य प्रकारच्या अडचणींच्या गर्तेत अडकून पोलीस कर्मचारी आत्महत्येसारखा पर्याय निवडतात. समाजाचे रक्षण करणारे पोलिसच असे खचून जात असतील तर याचा परिणाम पोलिसांच्या कामावर होतो. पोलिसांचे मनोबल वाढावे, त्यांनी आत्महत्येसारखा पर्याय निवडू नये यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी कर्मचा-यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, पोलीस कर्मचारी व त्यांच्या पाल्यांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिल्या आहेत.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात कार्त्यव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी महिलेने देहूरोड येथील राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केली. घरगुती वादातून त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांच्या पतीने त्यांच्या नावावर पोलीस सोसायटीमधून कर्ज घेतले होते. तसेच त्यांच्या एका नातेवाईक तरुणीवरून त्यांच्या घरात नेहमी वाद होत होते. त्यांच्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. पण ती चिठ्ठी खोटी असल्याचे मयत कॉन्स्टेबल महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

स्वताच्या गंभीर आजारपणामुळे, कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणामुळे, कुटुंबातील वाद, जमिनीचे वाद, त्यातून उद्भवणारी न्यायालयीन प्रकरणे, मुलांचे शिक्षण, त्यांच्या नोकरीचे प्रश्न, मुलीचे लग्न जमविण्यासाठी येणा-या आर्थिक अडचणी, रजा न मिळाल्याने, कार्त्यव्यासाठी बाहेर जावे लागल्याने कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष, कर्जबाजारीपणा, मानसिक दुर्बलता, प्रशासनिक कारणांमुळे येणारे नैराश्य. अशा अनेक अडचणींच्या गर्तेत अनेक पोलीस कर्मचारी अडकलेले आहेत. ते त्यांच्या अडचणी शक्यतो कुणालाही सांगत नाहीत. त्यामुळे त्यांना एकाकीपणा वाटतो आणि त्यांच्या नैराश्यात भर पडते.

यावर मात करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना काही सूचना दिल्या आहेत –

# पोलीस ठाण्यातील कर्माचा-यांची वैद्यकीय तपासणी करावी

# मानसोपचार तज्ञांची गरज असल्यास तशी व्यवस्था करावी. अशा कर्माचा-यांना कर्तव्यासाठी शस्त्र देऊ नये.

# कर्मचारी अथवा त्यांचे कुटुंबीय दुर्धर आजाराने ग्रस्त असतील तर त्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचारासाठी मदत करावी

# नियमितपणे आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. त्यामुळे त्यांना असलेल्या आजारांचे निदान होऊन त्यावर उपचार घेणे सोयीस्कर होईल

# तणावमुक्तीसाठी योगाभ्यास, विपश्यना शिबिरे घ्यावी

# मद्यसेवनाच्या आहारी गेलेल्या कर्माचा-यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावे

# कर्माचा-यांच्या दहावी-बारावीमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावी

# कर्माचा-यांच्या बेरोजगार मुलांसाठी कंपन्या व विविध अस्थापना मंडळांशी चर्चा करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात

# कर्माचा-यांच्या मुलांच्या प्रवेश, शिक्षणात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांशी संपर्क करावा

# सर्व कर्माचा-यांना कामाचे समान वाटप करावे

# कर्माचा-यांकडून आलेल्या आज्ञांकित कक्ष मिळण्याबाबतच्या अर्जावर नियमितपणे आज्ञांकित कक्ष घेऊन त्यांच्या अडचणींचे निराकरण करावे

# कर्माचा-यांचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी त्यांच्या नैमित्तिक रजा, अर्जित रजा, साप्ताहिक सुट्टी नियमित देण्यात याव्यात

# कर्माचा-यांचे निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती उपादान, साप्ताहिक सुट्टी मोबदला, इतर भत्ते, पगार वेळेवर होईल याची काळजी घ्यावी

# वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दररोज सायंकाळी रोल कॉलच्या वेळी कर्माचा-यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करावे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.