Kolhapur News : लॉकडाऊनपूर्वी दुर्बल घटकांना आर्थिक मदत करा : चंद्रकांत पाटील

एमपीसीन्यूज : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या समस्येवर तोडगा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कडक लॉकडाऊनवरच भर आहे. मात्र, तत्पूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणे गरजेचे आहे. जनतेच्या अडचणींवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करु नये, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या व्हर्चुअल बैठकीनंतर पाटील कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या सर्व प्रयत्नांना भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे. मात्र, हे प्रयत्न करत असताना सर्वसामान्य माणूस भुकेनं मरणार तर नाही ना, याची दखल राज्य शासनाने घेतली पाहिजे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या सर्वच नेत्यांनी हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे, तसेच त्यावर मार्गही सुचविले आहेत. त्याचा शासनाने गांभीर्याने विचार करुन निर्णय केला पाहिजे.

राज्यातील सर्व आमदारांना शासनाने विकासकामांसाठी दोन कोटीचा निधी वाढवून दिला आहे. राज्यातील जवळपास 350 आमदारांना 700 कोटींच्या आसपास हा निधी मिळतो. हा वाढीव निधी कोरोनावर उपाययोजना आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची परवानगी दिली पाहिजे.‌

पाटील म्हणाले की, सध्या निधीआभावी आज कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी रुग्णालयांची दमछाक होत आहे. राज्य सरकारही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पॅकेज जाहीर करण्यासाठी निधीच्या कमतरतेचं कारण देत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आमदारांना दोन कोटीचा वाढीव निधी दिला आहे. तो कोरोनासाठी खर्च करण्याची मुभा द्यावी. हा वाढीव निधी उपलब्ध करून दिल्यास समस्या आरोग्य यंत्रणांवरचा ताण कमी होईल, आणि नागरिकांना अधिक चांगले उपचार मिळतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.