IPL 2021 : कोहलीच्या पदरी अखेर निराशाच, कोलकाताने रोमहर्षक सामन्यात आरसीबीवर केली चार गडी राखून मात

13 तारखेला दिल्ली विरुद्ध केकेआरच भिडणार

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – शारजा येथे आज कॉलिफायचा दुसरा सामना कोलकाता आणि रॉयल चॅलेंज बंगलोर या दोन संघांत सामना झाला, ज्यात आरसीबीचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची त्याच्या अंतिम सामन्यात निराशाजनक हार झाली आणि कोलकाता नाईट रायडर्सने कठीण प्रसंगी खंबीर खेळ करत उत्कंठावर्धक विजय मिळवून कोहलीचा अंतिम सामना कटू केला.

विराट कोहलीसाठी कर्णधार म्हणून हा शेवटचा मोसम होता, याआधी या महान खेळाडूला कधीही कर्णधार म्हणून आयपीएलची ट्रॉफी उंचावता आली नव्हती, त्यामुळे त्याच्या संघातील खेळाडू आपल्या कर्णधाराला उत्तम खेळ करून त्याला निरोप देणार का, ही उत्सुकता सर्वानाच होती, त्यात आज कोहलीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी आपल्या शेवटच्या सामन्यातल्या अंतिम अकरामध्ये काहीही बदल केला नाही.

आरसीबीसाठी सातत्याने चांगली सुरुवात करून देणाऱ्या देवदत्त पडीकल सोबत कर्णधार कोहलीने डावाची सुरुवात केली. आक्रमक अंदाज दाखवत दोघांनी पहिल्या गड्यासाठी 5 षटकांत 49 धावांची चांगली भागीदारी केल्यानंतर देवदत्त वैयक्तिक 21 धावांवर फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला.

त्याच्या जागी मागच्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करून संघाला विजयी करणारा श्रीकर भरत खेळायला आला, मात्र त्याला आज काहीच खास करता आले नाही. तो 16 चेंडूत केवळ 9 धावा काढून सुनील नारायणच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

त्यानंतर आरसीबीच्या विकेट्स ठराविक अंतराने पडत गेल्या. आतापर्यंत चांगला खेळत असलेला कर्णधार कोहली पण 39 धावा करून सुनील नारायणच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. चांगल्या फॉर्मात असलेल्या मॅक्सवेलला सुद्धा आज नेमका फॉर्मने दगा दिला आणि तो सुद्धा धावा काढून नारायणचाच आणखी एक त्रिफळा बळी ठरला.

नारायणने आज चार तर फर्ग्युसनने दोन गडी बाद केले. त्यांच्या किफायतशीर गोलंदाजीमुळे आरसीबीचा डाव केवळ 138 धावांवर संपला. चांगल्या सुरुवातीनंतर आरसीबीला पुढे तो खेळ चालू न ठेवता आला नाही अन अंत्यत महत्वाच्या सामन्यात आरसीबीचा संघ ढेपाळला. यास ना एबी अपवाद ठरला ना मॅक्सवेल ना इतर कोणी.

अर्थात कमी धावसंख्या असलेले सामने नेहमीच रंगतदार ठरतात असा इतिहास शारजाच्या मैदानाचा असल्याने या सामन्यात तसेच घडेल, अशी आशा आरसीबी समर्थकाना होती, तशी सुरुवात त्यांना मिळाली सुद्धा! शुभमन गीलने वेंकटेश अय्यर सोबत 41 धावांची सलामी दिल्यावर हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर 18 चेंडूंत वेगवान 29 धावा काढून पहिल्या पॉवर प्लेच्या सहाव्या षटकातच बाद झाला .

त्याच्या जागी राहुल त्रिपाठी आला, पण तो आला आणि लगेचच गेला. चहलने त्याला पायचित केले. त्याने केवळ पाच धावा केल्या. त्यानंतर आलेल्या नितीश राणाने अय्यरला साथ द्यायला सुरुवात केली. दोघेही चांगले खेळायला लागले असे वाटत असतानाच वेंकटेश अय्यरला हर्षल पटेलने एका अप्रतिम चेंडूवर चकवत यष्टीरक्षक श्रीकर भरतच्या हातून झेलबाद करत आपला या स्पर्धेतला 32 वा बळी मिळवत द्वेन ब्रावोच्या 2013 पासून अबाधीत असलेल्या विक्रमाची बरोबरी केली.

अय्यरने 30 चेंडूत 26 धावा केल्या. यावेळी केकेआरची अवस्था 11 षटकात तीन गड्याच्या मोबदल्यात 79 धावा होत्या. आणि स्थिरावलेला अय्यर बाद झाल्याने दडपणही वाढले होते, पण केकेआरचा कर्णधार मॉर्गनने सुनील नारायणला आपल्या आधी पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्याने पहिल्या पाचच चेंडूंत 19 धावा करत सार्थही ठरवला आणि दडपण कमी करण्यात यशही मिळवले.

त्याच्या या धडाक्यात ख्रिस्तीयनची पुरती वाताहात उडाली आणि त्याने तब्बल 22 धावा एकाच षटकात दिल्या.

पण याच दरम्यान जम बसलेल्या नितीश राणाला चहलने 25 धावांवर बाद करून पुन्हा एकदा सामन्यात रंगत आणली. यावेळी केकेआरच्या पंधराव्या षटकात चार गडी बाद 110 धावा झाल्या होत्या.

अजूनही विजय 30 धावांवर होता. विजय नक्की कोणाचा होईल हे कोणीही सांगू शकत नव्हते. आणखी पंधरा धावा वाढल्या असतानाच मोहम्मद सिराजने सतराव्या षटकात दोन चेंडूच्या अंतराने सुनील नारायण आणि दिनेश कार्तिकला बाद करून पुन्हा एकदा सामना आरसीबीच्या बाजूने झुकवला.

पुढच्या बारा चेंडूंत 12 धावा हव्या असताना 19 व्या षटकात पाचच धावा आल्याने सहा चेंडूत सात धावा असे समीकरण होते, पण शकीबने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत दडपण झुगारून लावले आणि मॉर्गनच्या साथीने कोलकाता संघाला विजयी करून दिल्ली विरुद्ध लढण्यासाठी शड्डू ठोकला. प्रथम गोलंदाजी करत चार गडी बाद करणाऱ्या सुनील नारायणने मोक्याच्या क्षणी  महत्त्वपूर्ण 26 धावा करून अष्टपैलू कामगिरी करणारा सुनील नारायण सामन्याचा मानकरी ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.