IPL 2021 : बातमी आयपीएलची – कोलकाता तो हारी गियो, राजस्थान रॉयल्स क्या खूब खेलो भाया!

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने उत्तम खेळ करत कोलकाता संघाला सहा गडी राखून हरवत या स्पर्धेतला आपला दुसरा विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून संजू सॅमसनने कोलकाता संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तुलनेने मजबूत असलेला कोलकाता संघ आज या तुलनेला जराही जागला नाही.

शुभमन गील आजही विशेष चमक दाखवू शकला नाही ना नितीश राणा सुद्धा. बिनीचे हे शिलेदार वैयक्तिक अनुक्रमे 11 आणि 22 धावाच जमवू शकले . पाठोपाठ इयान मॉर्गन आणि सुनील नारायण सुद्धा.

यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीने धडाकेबाज फलंदाजी करताना दोन षटकार आणि एक चौकार मारत 36 धावा जोडल्या खऱ्या पण तो याच धावसंख्येवर बाद झाला आणि कोलकाता संघाचा डाव गडगडला तो गडगडलाच. आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, पॅट कमिन्स ही आक्रमक फलंदाजी आज संघाला काहीही विशेष असे योगदान देऊ शकली नाहीत आणि केवळ 133 च धावा कोलकाता राजस्थान रॉयल्सला आव्हान म्हणून उभा करू शकला.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पासूनच ज्याच्या खेळापेक्षा ज्याच्या महागड्या लिलावाची चर्चा चर्चेत होती त्या ख्रिस मॉरिसने आज आपला करिष्मा दाखवून दिलाच. चार षटकात 23 धावा देताना त्याने चार गडी बाद करत कोलकाता संघाला कमीत कमी धावसंख्येवर रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली.

त्याला उनाडकट, मुस्तफिजूर आणि साकरियाने एकेक बळी मिळवून उत्तम साथ दिली. राहुल त्रिपाठीच्या 36 धावा कोलकाता संघातर्फे वैयक्तिकरित्या सर्वोच्च ठरल्या.

134 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने सुद्धा खराब सुरुवातच केली. जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल आज काही यशस्वी ठरले नाही, पण त्यानंतर संजू सॅमसन आणि शिवम दुबेने चांगली भागीदारी करत संघाला विजयाजवळ आणले. शिवम दुबे आकर्षक खेळत असला तरी त्याला विजय मिळेपर्यंत आपली विकेट टिकवून ठेवायला जमायला हवे, तरच भारतीय संघातल्या संधीचे दार त्याला ठोठवता येईल, अन्यथा..

संजू सॅमसनने मात्र आज कोणतीही चूक न करता जम बसल्यावर संघाला विजय प्राप्त करूनच दिला. त्याला डेविड मिलरने आक्रमक फटके मारत 24 धावा जोडत एक मोठा विजय प्राप्त करून दिला. शिवम मावीने चांगली गोलंदाजी केली खरी पण तुटपुंज्या धावसंख्येची पाठराखण करण्यासाठी ती पुरेशी नव्हती.

राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला म्हणण्यापेक्षा कोलकाता संघाने हाराकीरी करत आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला असे म्हणणे जास्त योग्य राहील, अर्थात त्यांच्यासाठी ही स्पर्धा संपली असे मुळीच नाही, पण यापुढील सामन्यात त्यांना कठोर मेहनती शिवाय गत्यंतर नाही, हेच खरे.

चार बळी मिळवणारा ख्रिस मॉरिस सामनावीर ठरला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.