Kondhwa Crime News : ऑनलाईन क्लासमध्ये मुलगा लक्ष देत नसल्याचा राग पत्नीवर काढला, पतीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : ऑनलाईन क्लास सुरू असताना मुलगा शिक्षणाकडे लक्ष देत नसल्यामुळे चिडलेल्या पतीला शांत राहण्यासाठी सांगणाऱ्या पत्नीलाच पतीने लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.

याबाबत 32 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर तिच्या पती विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला आणि आरोपी पती-पत्नी आहेत. त्यांना पाच वर्षे वयाचा मुलगा आहे. कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.

26 जुलै रोजी संबंधित मुलाचा ऑनलाईन क्लास सुरु होता. यावेळी मुलाचे क्लासकडे लक्ष नव्हते. त्यामुळे आरोपी मुलाला ओरडला. “तू टाइमपास करतोय. तुझे अभ्यासाकडे लक्ष नाही. मी तुझा मोबाईल फोडून टाकेल,” असे बोलून आरोपीने मुलासमोरील मोबाईल उचलून बंद केला आणि बाथरूममधील पाण्याची बादली तोडली.

या सर्व प्रकारानंतर घरात असणाऱ्या पत्नीने पतीला ‘शांत रहा,’ असे सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने आरोपीने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर घरातील कॅरम बोर्ड पत्नीच्या डोक्यात मारून, जखमी केले.

या प्रकारानंतर पत्नीने पोलिस धाव घेत तक्रार दिली. कोंढवा पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.