Kondhwa Crime News : काळी जादू उतरविण्यासाठी उकळले चार लाख; दोघा भोंदूबाबांवर गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : जादूटोण्याची भीती दाखवून भावावरील करणी उतरविण्यासाठी खास कबुतरे लागतील, असे सांगून दोघा भोंदूबाबांनी एका तरूणाकडून 3 लाख 80 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आली. ही घटना 25  नोव्हेंबर ते 19 जानेवारी 2020  कालावधीत घडली.

कुतूबुद्दीन नजमी आणि हकिममुद्दीन मालेगाववाला, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अबिझर (पूर्ण नाव नाही) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अबिझर कुटुंबीय कोंढवा बुद्रूकमध्ये राहायला आहे. काही दिवसांपुर्वी त्यांचा भाऊ आजारी पडला होता. अनेक औषधोपचार करूनही त्याला आराम मिळत नव्हता. त्यामुळे अबिझर यांची आई एका धर्मगुरूकडे प्रार्थना करण्यासाठी गेली असता तेथे मालेगाववाला यांच्याशी ओळख झाली.

त्यानंतर मालेगाववालाने अबिझर यांच्या आईला फोन करून भावावर उपचार करण्यासाठी एकजण घेउन येत असल्याचे सांगितले. त्यानुसार मालेगाववाला आणि नजमी दोघेही अबिझर यांच्या घरी गेले. अबिझर यांच्या भावावर पत्नीने करणी केली असल्याचे नजमी यांनी सांगितले. तुमच्या चांगल्या कामामुळे भाऊ जिवंत आहे. मात्र, अजूनही तो 75 टक्के डेंजर झोनमध्ये असल्याचे सांगितले. त्यामुळे अबिझर यांचे कुटुंबीय घाबरले.

त्यानंतर त्यांनी यावर दोघांकडे उपायाची विचारणा केली. तेव्हा नजमी आणि मालेगाववाला यांनी अबिझर कुटुंबीयांना मुंबईत कबुतरे असून, काळी जादू स्वतःवर घेतात. त्यामुळे सगळा त्रास कमी होतो. मात्र, ही कबुतरे महाग असल्याचे या दोघांनी त्यांना सांगितले.

त्यानंतर दोघांनी अबिझर यांच्या भावावरील करणी उतरविण्यासाठी 3 लाख 80 हजार रूपये घेतले. आणि जादूटोणा आणि काळी जादू उतरविण्याच्या बहाण्याने नजमी आणि मालेगाववाला यांनी फसवणूक केल्याची तक्रार अबिझर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.