Pune : एल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार – पुणे पोलीस

एमपीसी न्यूज – एल्गार परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उफाळून आला, असा ठपका पुणे पोलिसांनी ठेवला आहे. या हिंसाचारासाठी एल्गार परिषदेचे आयोजक जबाबदार असल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं असून या परिषदेचं आयोजन बंदी घातलेल्या सीपीआयच्या माओवाद्यांनी केलं होतं असंही नमूद केलं आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या चौकशी आयोगासमोर पुणे शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. एल्गार परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे उपस्थितांमध्ये तणावाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला, असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

सेनगावकर यांनी पुणे शहर पोलिसांच्या वतीने शुक्रवारी चौकशी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं. सेनगावकर यांच्या हद्दीत एल्गार परिषदेचं आय़ोजन करण्यात आलं होतं. या प्रतिज्ञापत्रात एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणं, त्या भाषणांविरोधात दाखल झालेले एफआयआरची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. कोरेगाव-भिमा हिंसाचारावर कोणत्याही शासकीय संस्थेकडून पहिल्यांदाच एल्गार परिषदेवर हिंसाचाराचा थेट ठपका ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.