Kothrud Crime News : क्राईम पेट्रोल मालिका पाहून कोथरूडमधील ‘त्या’ अल्पवयीन मुलाचा खून

अल्पवयीन ताब्यात

एमपीसीन्यूज : कोथरूडमध्ये अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात तपास पथकाला यश आले आहे. पकडा-पकडी खेळत असताना दोन वेळा राज्य आल्याच्या रागातून त्याने मित्राला डोक्यात मारले. त्यामुळे तो खाली पडल्यानंतर अल्पवयीन मित्राच्या डोक्यात सिमेंटचा दगड मारून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीने क्राईम पेट्रोल मालिका पाहून अतिशय थंड डोक्याने खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील दोन दिवसांपासून कोथरूड तपास पथकाने अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

विश्वजीत वंजारी (वय 11) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. केळेवाडी परिसरात तो राहत होता. 29 जानेवारीपासून तो बेपत्ता होता. कोथरूड पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणी त्याच्या आईने फिर्याद दिली होती.

या मुलाचा शोध घेत असताना रविवारी दुपारच्या सुमारास पौड रस्त्याशेजारी असणाऱ्या एका निर्जन ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला होता. तपासादरम्यान पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यानेच खून केल्याची कबुली दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.